महागाईच्या छायेने दिवाळी फिकी
By admin | Published: November 14, 2015 02:00 AM2015-11-14T02:00:05+5:302015-11-14T02:00:05+5:30
दिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्व जाणुन ती परिपूर्ण साजरी करण्याकरीता सुगंधी उटणे, तेल, साबणापासून आकाशकंदील, उंची कपडे, मिठाई व पारंपारीक गोडधोड, दिव्यांची तोरणे
पंकज राऊत, बोईसर
दिवाळीतील वेगवेगळ्या दिवसाचे महत्व जाणुन ती परिपूर्ण साजरी करण्याकरीता सुगंधी उटणे, तेल, साबणापासून आकाशकंदील, उंची कपडे, मिठाई व पारंपारीक गोडधोड, दिव्यांची तोरणे, नक्षीदार पणत्या, रांगोळ्या, ग्रीटींग कार्ड इ. बरोबरच सोने खरेदी आणि घरातील टी.व्ही. फ्रीज, ए.सी पर्यंत अगदी परिस्थितीनुरूप खरेदी करून दिवाळीचा सण वेगळ्या वातावरणात आनंदात वर्षानुवर्षे साजरा करण्यात येतो. यंदा मात्र, हा ट्रेंड थोडा बदलला. यावर्षी महागाई बरोबरच आर्थिक मंदीचे सावट दिसत होते. मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये थोडी खुशी जास्त गमच दिसत होती. ग्राहकांच्या पसंतीस उतरावे म्हणून प्रत्येक बारीक सारीक वस्तूंमध्ये अनेक व्हरायटी खुप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी खरेदी करून दुकाने थाटली होती. दुकानांसमोर आकर्षक लायटींग करून ग्राहकांना आकर्षीत करण्याचाही प्रयत्न केला गेला.
गुरुवारी भाऊबीज असली तरी मार्केट, व्यापारी पेठांमध्ये सर्व व्यापाऱ्यांमध्ये उत्साह कमीच दिसला. तर बोईसरमध्ये फटाक्यांची सुमारे पंचवीस दुकाने मुख्य रस्त्यालगत मोठ मोठी थाटली होती. त्यापैकी बहुसंख्य फटाके विक्रेत्यांकडे विक्री न झालेले फटाके मोठ्या प्रमाणात शिल्लक राहीले असून आता ते पुढील वर्षापर्यंत सुरक्षितपणे कुठे ठेवायचे या चिंतेत फटाके विक्रेते दिसले.
मुळातच वाढलेली महागाई, मोजक्या कंपन्या सोडल्या तर कंत्राटी कामगारांना मिळालेला तुटपूंजा बोनस तर काही बोनस पासून वंचित राहीलेले कामगार महिन्याचा खर्च भागवताना करावी लागणारी कसरत, पाल्यांचा शिक्षणाचा वाढलेला खर्च व गरजा इ सर्व कारणांचा फटका व्यापाऱ्यांना बसला. तर ग्राहकांचा गरजेच्याच वस्तु खरेदीवर अधिक भर दिसल्याने एकंदरीत हातच राखुनच खरेदी झाल्याचे सर्वत्र दिसून आले.
अनाथ मुलांसोबत पोलिसांची दिवाळी;
कपडे, फराळ, मिठाईचे वाटप
मनोर : मनोर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी यंदाची दिवाळी हलोली अनाथ आश्रम शाळेतील लहान मुलांबरोबर साजरी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांच्याहस्ते कपडे, फराळ तसेच मिठाई मुलांना वाटण्यात आली. तसेच काही निराधार वृद्धांनाही वस्तूंचे वाटप केले. सहा. पो. नि. मारोती पाटील, उपनिरिक्षक सोनावणे, मोहन पाटील आदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नागरीकांचे संरक्षण करणारे तसेच परिसरात कायदा - सुव्यवस्था ठेवणारे पोलीस क्वचितच मुलेबाळे, परिवारासह सण साजरा करतात. मात्र मनोर पोलीसांनी एक चांगला उपक्रम राबवत अनाथ मुलांनाच आपला परिवार समजत हलोली येथील स्वागत चॅरीटेबल ट्रस्टमधील मुलांसोबत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. (वार्ताहर)
शिख समाजाची दिवाळी अंधारात
च्वसई : शिख समाजाच्या पवित्र ग्रंथाचा अवमान झाल्याप्रकरणी शिख समाजाच्या वरिष्ठ धर्मगुरूंनी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वसईतील गुरूद्वारामध्ये शिख बांधवांनी काळे कपडे परिधान करुन अंधारात दिवाळी साजरी केली.
च्दरवर्षी वसई पश्चिमेस असलेल्या अंबाडी रोड येथील गुरूद्वारामध्ये दिपावली सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गुरूद्वारावर दिव्याच्या माळा सोडण्यात येतात. तसेच पणत्या लाऊन गुरूद्वाराचा संपूर्ण परिसर उजळत असतो. परंतु यंदा शिख बांधवांनी कोणतेही उपक्रम राबवले नाहीत तसेच काळे कपडे घालून कीर्तनपाठ करण्यात आले.
च्पवित्र ग्रंथाचा अवमान झाल्यामुळे शिख समाजात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करण्याकरीता शिखांच्या वरिष्ठ धर्मगुरूंनी यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याचे जाहीर केले होते.
आदिवासी पाड्यावर दीपोत्सव; घोलवड पोलिसांचा उपक्रम
बोर्डी : पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या झारली या दुर्गम आदिवासी पाड्यावर नवीन वर्षाच्या निमित्ताने गुरूवार १२ नोव्हेंबर रोजी घोलवड पोलीसांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. या उपक्रमाद्वारे पोलीस नागरीक समन्वय वृद्धीगत होण्यास हातभार लागेल अशी प्रतिक्रीया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीचे औचित्य साधून पोलीस, नागरीक संबंध वृद्धीगत करण्यासाठी घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत गावांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोसबाडनजीकच्या झारली या पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम आदिवासी पाड्यावर झालेल्या कार्यक्रमात आदिवासी बालगोपाळांशी सहाय्यक पोलीस निरिक्षक बांगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने संवाद साधत आदिवासी मुलांसह दिवाळी साजरी केली.
यावेळी कुटूबापासून दुर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई, फटाके इ. वाटप केले. वाकी येथील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून बक्षीस वितरण केले. घोलवड येथे आयोजित कार्यक्रमात शांतता व सुव्यवस्था राखून सण साजरा करण्याबाबत नागरीकांना मार्गदर्शन केले. यावेळी डहाणू पंचायत समिती सभापती चंद्रिका आंबात, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश अमृते आदींसह नागरीक उपस्थित होते. (वार्ताहर)