अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊच नका - निधी चौधरी
By admin | Published: June 15, 2017 02:29 AM2017-06-15T02:29:56+5:302017-06-15T02:29:56+5:30
जिल्ह्यातील ६४ शाळा अनधिकृत पणे चालवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जीवघेणा खेळ खेळला जात असून शिक्षण विभाग या अनधिकृत शाळा विरोधात कारवाईच्या नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यातील ६४ शाळा अनधिकृत पणे चालवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जीवघेणा खेळ खेळला जात असून शिक्षण विभाग या अनधिकृत शाळा विरोधात कारवाईच्या नोटिसा बजावत असतांना वरिष्ठ पातळी वरून मात्र या कारवाईला स्थगिती दिली जात असल्याने शिक्षण विभाग हतबल ठरत आहे. ह्या पार्श्वभूमीवर अशा अनधिकृत शाळां मध्ये पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हापरीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ६४ शाळा अनिधकृत असल्याचे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केले असून त्यातील ४३ शाळा या एकट्या वसई तालुक्यात आहेत. तर जव्हार तालुक्यात एक,पालघर तालुक्यात ११,विक्र मगड तालुक्यात ४, वाडा तालुक्यात ५ शाळा आहेत.ह्या ६४ शाळा मधील अनेक शाळा अनधिकृतपणे चालविल्या जात असल्याचे शिक्षण विभाग वरिष्ठ पातळीवर कळवत असले तरी त्या शाळांवर कारवाई करण्यासाठी उगारलेले हात मात्र मध्येच छाटण्याचे काम मंत्रालयीन पातळीवरील अधिकारी करीत आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग जरी ह्या शाळा अनधिकृत म्हणून प्रत्येक वर्षी घोषित करीत असले तरी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने हा आकडा प्रत्येक वर्षागणिक वाढतच चालला आहे. या अनधिकृत शाळांमध्ये गरीब, झोपडपट्टीत राहणारी कुटुंबे आपल्या मुलांना घालीत असल्याने त्यांच्या पुढे अनेक शैक्षणिक समस्या उभ्या राहत आहेत. तर दुसरी कडे या अनधिकृत शाळेचे संस्थाचालक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा दहावीच्या परिक्षेसाठी इतर शाळा मार्फत बसवून पालकांची दिशाभूल करीत असतात. बोईसर भागात असलेल्या अनेक अनधिकृत शाळा मधील शिक्षक वर्ग हा उच्चशिक्षित नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले असून त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर होत असतो. त्यामुळे या शाळांमध्ये कुणीही प्रवेश घेऊ नये असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश कंकाळ यांनी केले आहे.