विरोधकांच्या दबावाला घाबरणार नाही- आ.ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:25 PM2019-04-21T23:25:50+5:302019-04-21T23:26:14+5:30
वाघाचे मांजर झाल्याची उपरोधिक टीका
डहाणू : विरोधकांच्या दबावाला घाबरणार नाही, युती सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून जनतेवर अन्याय केला आहे.राजकीय तत्वांना हरताळ फासणाऱ्या युतीच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी महाआघाडी तयार असल्याचे परखड मत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी डहाणू दशश्री हॉल येथे शनिवारी झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नसून आता सेनेचा वाघ म्हणजेच उद्धव मांजर झाला असल्याची उपरोधिक टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. युतीच्या विरुद्ध महायुतीचा निश्चित विजय होणार असून कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागावे असे अवाहन आमदार आनंद ठाकूर यांनी केले. तसेच प्रत्येक निवडणुकीचे वेळी राम मंदिराच्या मुद्दा उपस्थित करून नरेंद्र मोदी आणि योगी हे लोकांना मूर्ख बनवित असतात त्यांच्या खोटारडेपणाची हद्द झाली असून आता जनता फैसला करणार आहे असे ते म्हणाले. मसोली येथील दशाश्री समाज वणीक सभागृहात महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या प्रचार सभेत ठाकूर यांनी युतीच्या जनताविरोधी धोरणांवर कडक टीकास्त्र सोडले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डहाणू विधानसभा अध्यक्ष राजेश पारेख उपस्थित होते.
शिंदेवर निशाणा
स्व.आनंद दिघे यांच्याप्रमाणे दाढी ठेवण्याचा सुरु वातीला मी प्रयत्न केला. पण नाही जमले. मात्र आता शिवसेनेचे काही नेते दाढी वाढवून स्वत: आनंद दिघे यांच्याप्रमाणेच केविलवाणा आव आणतात. परंतु दिघे यांच्या कार्याची सर त्यांना कधीच येणार नाही, असे सांगून ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदेवर निशाणा साधला.