पेंडक्याचीवाडीला पाणीटँकर मिळेना
By admin | Published: March 12, 2017 02:13 AM2017-03-12T02:13:38+5:302017-03-12T02:13:38+5:30
धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासी बांधवाना डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना
- रविंद्र साळवे, मोखाडा
धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासी बांधवाना डिसेंबरपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना देखील जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अजूनपर्यत टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही.
चारशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावपाड्याला दरवर्षीच पाणीटंचाई निर्माण होत असते. यामुळे येथील भूमीपुत्राना डिसेंबरपासून घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथील महिला पुरुषांना विहिरीवरच मुक्काम ठोकून रात्रभर नंबर लाऊन विहिरीत उतरून पाणी भरावे लागते.
टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मोखाडा तहसील कार्यलयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे परंतु अद्याप तो मंजूर झालेला नाही. उन्हाळाच्या शेतीच्या कामात गुंतलेल्या बांधवाना हातचे काम टाकून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने कुणी टँकर देता का टँकर अशी म्हणण्याची वेळ या बांधवा वर येऊन ठेपली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपुरवठ्याचा विषय जीवनावश्यक बाब असल्याने २४ तासांत त्याबाबतचा निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र, शासनाच्या उदासिन धोरणामुळे तारीख पे तारीख अशीच टॅँकर मागणीच्या प्रस्तावाची अवस्था झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना एखादा पाणी बळी गेल्यावर जाग येईल का? (वार्ताहर)
जलयुक्त शिवार योजनेत ही वाडी कधी समाविष्ट करणार?
पाणी टंचाईग्रस्त झाल्याने दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागणाऱ्या गावपाड्यांची जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत निवड करायची आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अशा विविध योजना राबवून येथील भूजल पातळी वाढवूना पाणी टंचाई आटोक्यात आणता येईल. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पेंडक्याचीवाडीत गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून त्याला जलयुक्त शिवार योजनेमध्ये समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे तात्काळ हे गाव पाडे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात यावीत अशी मागणी रामदास बरफ यांनी केली आहे. ती जिल्हाधिकारी कधी पूर्ण करणार?