भूमीपुत्रांना उद्ध्वस्त करणारे प्रकल्प लादू नका - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 02:12 AM2018-03-25T02:12:39+5:302018-03-25T02:12:39+5:30
रोजगार नष्ट होऊन स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होतील, असे कोणतेही निर्णय सरकारने घेऊ नयेत, तसेच असे प्रकल्पही लादू नये. प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वाढवण बंदराला असलेला जनतेचा तीव्र विरोध मी राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
पालघर : रोजगार नष्ट होऊन स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होतील, असे कोणतेही निर्णय सरकारने घेऊ नयेत, तसेच असे प्रकल्पही लादू नये. प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. वाढवण बंदराला असलेला जनतेचा तीव्र विरोध मी राज्य व केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले.
केंद्र सरकारची १९९१ची अधिसूचना कायम ठेवण्यात यावी, या संदर्भात डहाणूतील रिलायन्स एनर्जीच्या सभागृहात शनिवारी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. इंडस्ट्रियल कॉरिडोर, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, बुलेट ट्रेन हे तीन प्रकल्प डहाणू, पालघरला बाधित करणारे आहेत. त्यांची खरोखरंच जनतेला गरज आहे का? त्यांचा एकच पर्याय निघेल का? याचाही शासनाने गंभीरपणे विचार करावा, असेही ते म्हणाले.
विकासाला माझे समर्थन आहे. लोक विकासाचे स्वागत करीत असतात. त्याला कुणीच विरोध करत नाही. मात्र, हे प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊन राबवा, असेही पवार म्हणाले. फलोत्पादन, मच्छीमारीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. या चर्चासत्राला आमदार आनंद ठाकूर, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.