औद्योगिक वसाहत उठवू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:58 PM2019-01-17T23:58:24+5:302019-01-17T23:58:39+5:30
आंदोलनाची दिशा ठरणार : विरार - पनवेल कॉरिडॉर प्रकल्पाला वसई इंडस्ट्रीज असोसिएशनचा विरोध
वसई : विरार- पनवेल रेल्वे कॉरिडॉरच्या विरोधात नवघर पूर्वेकडील रहिवासी एकवटले असताना, औद्योगिक वसाहतीतूनही हा प्रकल्प होऊ नये म्हणून मोठा विरोध होत आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही याबाबत औद्योगिक वसाहतीवर वरवंटा फिरवून हा प्रकल्प होऊ नये म्हणून विरोध दर्शविला आहे. वसई इंडस्ट्रीज असोसिएशनच्या बैठकीत दोनशेहून अधिक व्यावसायिकांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवत आंदोलनाची दिशा ठरविण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या चाळीस वर्षापासून नवघर पूर्व येथे औद्योगिक वसाहत उभी आहे. विरार, नालासोपारा व वसई मार्गावरून हा प्रकल्प जात असताना रेल्वेकडून औद्योगिक क्षेत्रातून हा प्रकल्प नेण्यासाठी सर्वे सुरू केला होता. नवघर पूर्वेला गृहसंकुल, बैठी घरे, औद्योगिक कारखाने व झोपडपट्टी अशी संमिश्र वस्ती आहे. दहा दिवसांपूर्वी वृत्तपत्रातून याबाबत एका नोटिसीमार्फत विरार- पनवेल कॉरिडॉरबद्दल प्रसिद्धी देण्यात आली होती. याबाबत गुरूवारी दुपारी वसई इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने कपूर आॅटोमोबाईल येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. यात औद्योगिक वसाहतीतील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यावेळी २०० हून अधिक व्यावसायिक उपस्थित होते. विरार पॅनेल कॉरिडॉर प्रकल्प जर औद्योगिक क्षेत्राला हलवून केला गेला तर त्याला आमचा ठाम विरोध असेल, असा नारा यावेळी एकमूखाने देण्यात आला.
आमदार हितेंद्र ठाकूर व प्रांताधिकाऱ्यांचीही घेतली होती भेट
रेल्वे प्राधिकरणाकडून एजन्सी मार्फत दोनजणांना संपूर्ण नवघर औद्योगिक वसाहतीचा सर्वे करायला सांगण्यात आले होते. याबाबत वसई इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल अंबर्डेकर यांच्या शिष्टमंडळाने हा सर्वे करणाºयांची भेट घेत वरिष्ठांशी चर्चा होत नाही तोपर्यंत हा सर्वे करण्यात येऊ नये म्हणून विनंती केली होती. त्यानंतर हा सर्वे थांबविण्यात आला होता. याबाबत महाननर पालिकेकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक प्रशासनही अनिभज्ञ असल्याचे समोर आले होते. त्यानंतर शिष्टमंडळाने १२ जानेवारी रोजी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यांनीही हा प्रोजेक्ट औद्योगिक क्षेत्राला हलवून केला गेला तर हजारो कामगार देशोधडीला लागतील म्हणून विरोध दर्शवत प्रांताधिकारी दिपक क्षीरसागर यांना प्रोजेक्ट होऊ नये म्हणून लेखी निवेदन दिले होते. क्षीरसागर यांनाही याबाबत माहिती नसल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. सर्वेक्षण बंद करण्याबाबत रेल्वे प्राधिकरणाशी बोलणे झाले असून, यापूढे जर सर्वे करणार असाल तर सर्वांना विश्वासात घेऊ अशी माहिती प्रांताधिकारी यांनी दिली.
कामगार देशोधडीला
१९८० पासून नवघर पूर्व येथे उभी असलेली औद्योगिक वसाहत जर हा प्रकल्प या क्षेत्रातून नेला गेला तर २५०० व्यवसाय व जवळपास ६०,००० कामगारांवर बेकार होतील. या औद्योगिक क्षेत्रातून शासनाला मोठा कर मिळत आहे. स्थानिक प्रशासनही करोडो रूपये करवसूली करते. मग हा प्रकल्प औद्योगिक वसाहतीवरून का नेण्यात येत आहे असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे संपूर्ण औद्योगिक वसाहत संपून जाईल. तेथील छोटे-मोठे व्यावसायिक एकमेकांवर अवलंबून आहेत. तेथे या प्रकल्पाचा वरवंटा फिरला तर कामगारांना मोठा फटका बसेल. प्रांताधिकारी यांना याबाबत पत्र दिलेले आहे
- हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई विधानसभा
औद्योगिक क्षेत्रातील लोकांना विश्वासात घेऊन हा सर्वे करायला हवा होता. हा प्रकल्प औद्योगिक वसाहतीतून गेल्यास आमचा विरोध असेल. सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
- अनिल अंबर्डेकर, अध्यक्ष, वसई इंडस्ट्रीज असोसिएशन