युतीधर्म आम्हीच पाळायचा का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:30 PM2019-10-13T23:30:57+5:302019-10-13T23:31:31+5:30
शिवसैनिक नाराज : बोईसरमधील नाराजी विक्रमगडमध्ये भोवणार?
जव्हार : पालघर जिल्ह्यात युतीमधील बेबनाव रुळावर येताना दिसत नाही. बोईसर विधानसभा सेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे बंडखोर नेते संतोष जनाठे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे इथे युतीत वाद झालाच. मात्र, बोईसरमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उघडपणे जनाठे यांचा प्रचार करत असल्याने शिवसैनिक नाराज आहेत.
याचा थेट फटका आता विक्रमगड विधानसभेतही बसण्याची चिन्हे असून ‘आम्ही इमानेइताबरे तुमच्यासोबत राहायचे आणि तुम्ही मात्र आमचे उमेदवार पाडायचे’, अशी भावना आता काही शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. बोईसरची जागा भाजपला मिळावी यासाठी ज्याप्रमाणे भाजप प्रयत्नशील होती, त्याचप्रमाणे विक्र मगडची जागा सेनेला मिळावी यासाठी सेनेचे प्रयत्न सुरू होते.
बोईसरमध्ये जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. तर विक्रमगडमध्ये प्रकाश निकम यांनी पक्षपदाचा राजीनामा देत तटस्थ राहणे पसंत केले. पण बोईसर भागातील भाजप पदाधिकाऱ्यांनी उघडउघड जनाठे यांच्या प्रचारात उडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जनाठे यांनी राजीनामा दिल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी अपक्षाला पाठिंबा द्यायचा आणि आम्ही मात्र युती धर्म पाळायचा हे काही शिवसैनिकांना रुचलेले नाही. याचा परीणाम विक्र मगड विधानसभेत होऊ शकतो.