शस्त्रक्रिया करताना पुरेसा रक्तसाठा नव्हता; ‘त्या’ महिलेच्या प्रसूतीपश्चात मृत्यूस डॉक्टर जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 03:55 PM2021-11-13T15:55:05+5:302021-11-13T15:55:18+5:30
राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निर्णय : २१ लाखांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश. राष्ट्रीय आयोगाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाचे अध्यक्ष न्या. आगरवाल आणि डॉ. कांतीकर यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : दुर्मीळ रक्तगट असलेल्या महिलेची दुसरी सिझेरीन शस्त्रक्रिया करताना पुरेसे रक्त उपलब्ध न ठेवल्याने आणि प्रसूतीनंतर झालेला रक्तस्त्राव थांबवण्यासाठी वेळीच आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने संबंधित महिलेच्या मृत्यूस नालासोपारा येथील ताते हाॅस्पिटलचे डॉ. राजेश ताते हे जबाबदार आहेत. त्यामुळे डॉ. ताते यांनी संबंधित महिलेच्या कुटुंबाला २० लाख रुपये नुकसानभरपाईपोटी आणि एक लाख रुपये दाव्याच्या खर्चापोटी द्यावेत, असा आदेश राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे.
या प्रकरणात राज्य आयोगाने फेब्रुवारी २०१५ मध्ये डॉ. राजेश ताते यांच्या वैद्यकीय हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढून या महिलेच्या कुटुंबाला १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला डॉ. ताते यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगात आव्हान देऊन ते स्वतः निरपराध असल्याचा दावा केला होता, मात्र राष्ट्रीय ग्राहक आयोगाने मूळ तक्रारदार आणि डॉ. ताते यांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे, राज्य आयोगाचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचे यासंदर्भातील अनेक निकाल लक्षात घेऊन डॉ. ताते यांचे अपिल फेटाळून लावले असून नुकसानभरपाईची रक्कम येत्या ६ आठवड्यात देण्याचे आदेश दिले आहेत.
मयूरी ब्रह्मभट या महिलेने आपल्या दुसऱ्या प्रसूतीसाठी डॉ. राजेश ताते यांच्या नालासोपारा येथील हाॅस्पिटलमध्ये नाव नोंदवले होते. मयुरीची पहिली प्रसूती सिझेरीन शस्त्रक्रियेद्वारे झाली होती. तिचा दुर्मिळ रक्त गट असल्याची डॉ. ताते यांना पूर्वकल्पना होती. दरम्यान, २० सप्टेंबर १९९५ ला सकाळी ६.३० ला मयुरीला ताते हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सकाळी ९.३० वा. सिझेरीन शस्त्रक्रियेद्वारे मयुरीला मुलगी झाली, मात्र त्यानंतर तिला रक्तस्राव होऊ लागला. रक्तस्त्राव आटोक्यात येत नसल्याचे पाहून मयूरीच्या पतीने तिला ताबडतोब बोरिवलीच्या भगवती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्याची डाॅक्टरांना विनंती केली. तिथे सदर दुर्मीळ रक्ताची व्यवस्था केली आहे, असेही सांगितले. परंतु डॉ. ताते यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर दु. ३.३० वाजता मयूरीला भगवती हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने हा निर्णय फार उशिरा घेतला गेला. भगवती हाॅस्पिटलमध्ये मयूरी पोचली ती मृतावस्थेतच. या पार्श्वभूमीवर मयूरीचे पती सुश्रुत ब्रह्मभट यांनी राज्य ग्राहक आयोगापुढे १९९७ मध्ये डॉ. ताते यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून नुकसानभरपाईची मागणी केली होती.
राष्ट्रीय आयोगाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाचे अध्यक्ष न्या. आगरवाल आणि डॉ. कांतीकर यांनी दिला आहे. ब्रह्मभट कुटुंबियांतर्फे ॲड. शिरीष देशपांडे आणि डॉ. अर्चना सबनीस यांनी राज्य आणि राष्ट्रीय आयोगात बाजू मांडली तर डॉ. ताते यांची बाजू ॲड. आनंद पटवर्धन यांनी मांडली.