Doctors Day: जीवनदानाबरोबरच समाजभान जपणारे देवदूत; कोरोनाग्रस्त मृतदेहांवर करतात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:12 AM2020-07-01T01:12:27+5:302020-07-01T01:12:41+5:30
१ एप्रिल रोजी उसरणी येथील कोरोनाबाधित युवकाचा जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने जिल्हात कोरोनाच्या संसर्गाची मोठी भीती पसरली होती.
हितेन नाईक
पालघर : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात एका बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला नकार देत कर्मचारी स्मशानभूमीतून पळून गेल्यानंतर उद्भवलेल्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे आणि डॉ. उमेश दुप्पलवार यांनी त्या व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार करीत आपले कर्तव्य पार पाडले. डॉक्टर हे जीवनदान देणारे देवदूतच नाहीत, तर सामाजिक भान जपणारे कर्तव्यनिष्ठ नागरिकही आहेत, हे या दोघांनी त्या दिवशी दाखवून दिले.
१ एप्रिल रोजी उसरणी येथील कोरोनाबाधित युवकाचा जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने जिल्हात कोरोनाच्या संसर्गाची मोठी भीती पसरली होती. त्या युवकाचा मृतदेह रात्री अंत्यसंस्कारासाठी पालघर पूर्वेकडील स्मशानभूमीत नेण्यात आला. सदर व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे कळताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार देत पळ काढला. अशा परिस्थितीत काय करायचे, असा प्रश्न डॉ. खंदारे यांना पडला. अनेक कर्मचाऱ्यांना फोनवर कळवूनही कोणी यायला तयार नसल्याने त्यांनी सोबतीला असलेल्या डॉ. उमेश दुम्पलवार यांच्याकडे पाहिले. दोघांनी त्या व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा निश्चय केला आणि बाजूला पडलेली लाकडे गोळा करीत चिता रचली. जणू काही आपल्या घरातल्याचा मृत्यू झाला आहे अशा पद्धतीने या डॉक्टरांनी त्या रुग्णाला अग्नी दिला. यामुळे त्यांच्या कार्याला सर्वच थरातून सलाम केला जात आहे.
डॉ. खंदारे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात काम करीत असताना २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात उत्कृष्ट काम केल्याने शासनाने सन्मानित केलेले आहे. आज संपूर्ण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची साखळी वाढू नये यासाठी दिवस-रात्र आपल्या टीमसह काम करीत आहेत.