डॉक्टरांची दांडी, नर्सचा उपचारास नकार
By admin | Published: February 15, 2017 04:28 AM2017-02-15T04:28:49+5:302017-02-15T04:28:49+5:30
दांडी येथील निहार बोरसे ह्या सहा वर्षीय बालकाला विषारी सर्पाने दंश केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्टर गैरहजर होते.
हितेन नाईक / पालघर
दांडी येथील निहार बोरसे ह्या सहा वर्षीय बालकाला विषारी सर्पाने दंश केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्टर गैरहजर होते. परिचारीकेने प्राथमिक उपचार करण्यासही नकार दिल्याने असल्याने पालकांनी त्याला तत्काळ तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याने त्याचे प्राण वाचले. वादग्रस्त बाबी साठी दांडी प्राथमिक आरोग्य केंद्र ओळखले जात असून अनुपिस्थत डॉक्टरांवर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
निहार हा संध्याकाळी खेळत असताना घराच्या पायरीवर त्याला एका सर्पाने चावा घेतला. त्याने आपल्या वडिलांना ही बाब सांगितल्या नंतर तात्काळ त्याला दांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यावेळी आरोग्य केंद्राचे दार बंद होते. दरवाजा ठोठावला असता एका महिला कर्मचाऱ्याने बाहेर येत दोन्ही डॉक्टर नसल्याचे सांगितले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्या मुलाच्या पायाला रूमाल बांधून प्राथमिक उपचार केले व डॉक्टर नसल्याने मी औषधोपचार करू शकत नाही. त्याला इतरत्र उपचारासाठी न्या, असा सल्ला दिला. त्यामुळे घाबरलेल्या आईवडिलांनी त्याला लांबच्या तारापूर आरोग्य केंद्रात नेले तेंव्हा त्याच्यावर उपचार झाले.
जिल्हा परिषद दांडी गटातून तुळदीस तामोरे तर पंचायत समिती गणातून मोरे हे सेनेचे दोन उमेदवार मतदारांनी मोठ्या आशेने निवडून दिले आहेत. सेनेतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना मतदारांनी त्यांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले. मात्र त्याच्याच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. मोनाली स्वामी हे नियुक्त असतांना उच्छेली-दांडी येथील रूग्णांना तारापूर आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त रुग्णांचा बोजा तारापूर केंद्रावर पडल्याने डॉक्टर उपचारास नकार देतात. मुळात दांडी येथील आरोग्य केंद्रात नेहमीच डॉक्टर अनुपस्थित असल्याच्या तक्रारी असून काही वादग्रस्त घटनाही या केंद्रात होत असल्याच्या तक्रारी जिल्हा अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. दोन्ही डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आहे.