कोणी मातीचे मडके, रांजण, चुली घेता का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:15 AM2021-04-22T00:15:19+5:302021-04-22T00:15:32+5:30
कोरोनामुळे कारागीर आर्थिक संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : कोविड - १९चा प्रादुर्भाव वाढल्याने मनोर येथील मडके बाजार थंडावला आहे. कारागिरांनी मातीपासून विविध वस्तू बनवल्या आहेत, मात्र एप्रिल महिना संपत आला तरी ग्राहक येत नसल्याने यावर्षी प्रचंड नुकसान होणार असल्याच्या चिंतेत कारागीर
सापडले आहेत.
गरिबांचा फ्रीज म्हणून मनोरच्या मडके बाजारात लहान-मोठ्या रांजण, मडके यांना खूप पसंती असते. उष्णता वाढू लागली की, एप्रिलच्या सुरुवातीला ग्राहकांची गर्दी वाढू लागायची. रांजणासोबतच चुली, विविध प्रकारची मातीची भांडीही लोक आवर्जून घेऊन जायचे. आम्हाला त्याचा फायदा होत असे, परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने सध्या बाजारात येणाऱ्या लोकांची गर्दी कमी झाल्यामुळे आम्ही तयार केलेला माल पडून आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? अशी चिंता आम्हा सर्वांना पडली आहे.
मातीपासून घडवलेल्या विविध वस्तू तयार आहेत, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही ग्राहक येत नसल्याने रांजण, मडके व इतर वस्तू पडून आहेत. आमच्या आजोबा-पणजोबांपासून पारंपरिक पद्धतीने मातीपासून विविध आकाराच्या वस्तू बनवून विक्री करायचा हा व्यवसाय चालत आला आहे. पण सध्या ग्राहकच नसल्याने आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे, असे राहुल साळवी यांनी सांगितले.