डोंबिवली शाळांमध्ये पोळा उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:15 PM2019-08-31T23:15:14+5:302019-08-31T23:15:38+5:30
संडे अँकर । बैलांची केली पूजा : विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढून दिले विविध सामाजिक संदेश
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील अनेक शाळांमध्ये शुक्रवारी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर, सम्राट अशोक विद्यालयात, तर डोंबिवलीतील चरू बामा म्हात्रे विद्यामंदिरात हा सण साजरा करण्यात आला. बैलपोळ्यानिमित्त मिरवणूक काढून सामाजिक संदेश देण्यात आले. या शाळांमध्ये सजवलेले बैल आणून बैलपोळ्याविषयी माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सणांविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विविध शाळा हा उपक्रम राबवतात. अभिनव विद्यामंदिरमध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाने मातृदिन व बैलपोळा सण साजरा केला. यावेळी सर्जा-राजा या बैलजोडीचे पाद्यपूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांनी बैलपोळा सण साजरा केला. शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या कल्पनेतून नांदिवली गावचे शेतकरी भगवान ढोणे यांची बैलजोडी शाळेत आणून शाळेच्या आवारात बैलांना सजवून बैलांचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी बैलगाडीत बसून आनंद घेतला. डोंबिवली येथील चरू बामा म्हात्रे विद्यामंदिरातही शाळेचे संस्थापक अरुण म्हात्रे व पालक जगन म्हात्रे यांनी बैलांची पूजा केली.