‘ठेकेदारांना पाठीशी घालू नका’; पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:37 AM2020-05-30T01:37:45+5:302020-05-30T01:38:03+5:30
पालघर तालुक्यातील उंबरपाडा- नंदाडे व १७ गावे योजनेतील पाणी सर्व गावांना सुरळीतपणे वितरित होत नसल्याबद्दल खासदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
पालघर : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसंदर्भात खा. राजेंद्र गावित यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ठेकेदारांना पाठीशी घालू नका, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. पालघर, वसई, तलासरी, डहाणू, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा या तालुक्यात सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या वेळी आ. श्रीनिवास वनगा आणि केदार काळे उपस्थित होते .
पालघर तालुक्यातील उंबरपाडा- नंदाडे व १७ गावे योजनेतील पाणी सर्व गावांना सुरळीतपणे वितरित होत नसल्याबद्दल खासदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. अशाच तक्रारी नवघर, घाटीम, जलसार आदी गावांमधूनही येत असल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या योजनेंतर्गत अनेक ग्रामस्थांना पदरचे पैसे खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत असून नवघर-घाटीम येथील जनतेला दोन डोंगर पायी तुडवीत पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याची बाब खासदारांनी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली.
करवाळे ते नवघर नवीन पाईप लाईन टाकण्यास १२ लाखांचा लाखाचा खर्च अपेक्षित असून डॅमवरील ६० हॉर्सपॉवरची मोटर बंद पडल्याने दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे लक्षात घेता ही योजना जिल्हापरिषदेकडे वर्ग करायला हवी, असे खा. गावितांनी सुचविले. मासवण आणि पाच गावे नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत मासवण, गोवाडे, वसरोली, खारशेत, निहे, लोवरे या गावांना गावाना पाणी मिळणार असून पाच कोटी रुपये या योजनेसाठी खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत उभारण्यात येणारे जलकुंभाची (टाक्या) जागा वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यासंदर्भात वनविभागाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
माहीम - केळवा १७ गावे ह्या योजनेवर चर्चा होत पालघर तालुक्यातील ८४ बोरवेल उभारणी प्रस्तावापैकी २५ बोरवेलचे काम पूर्ण आहे. तर वसई ग्रामीणमध्ये ३४ पैकी १५ कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. तलासरी तालुक्यात झरी पाणीपुरवठा योजना पूर्ण होत आली असून ३० जून २०२० रोजी पाणी सुरु होईल. मोखाड्यात दरवर्षी पाणी टंचाई जाणवत असल्याने ५५ गावपाडे योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार असून मोखाडा लवकरच टँकरमुक्त होईल.