जव्हारमधील कुटीर रुग्णालयाची क्षमता दुप्पट; ९० कोटी ६२ लाख निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:13 PM2019-10-31T23:13:59+5:302019-10-31T23:14:28+5:30
वाढलेली लोकसंख्या आणि आदिवासी रुग्णांच्या आवश्यक सेवेचा विचार करता जव्हार येथील पतंगशाह कुटीर या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन क्रमप्राप्त होते.
जव्हार : जव्हारमधील पतंगशहा कुटीर रुग्णालय आता २०० खाटांचे होणार असून यासाठी अखेर निधी मिळाला आहे. उच्चाधिकार समितीने तब्बल ९० कोटी ६२ लाख रु पयांची मंजुरी दिली आहे. याबाबत नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय पारित केला आहे. २०१२ पासून याला कागदावर मंजुरी मिळाली होती. गेली काही वर्षे श्रमजीवी संघटना आणि संत रोहिदास चर्मकार आयोग समिती सदस्य विनीत मुकणे हे सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते. यामुळेच जव्हार कुटीर रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाची मागणी प्रत्यक्षात उतरली आहे.
वाढलेली लोकसंख्या आणि आदिवासी रुग्णांच्या आवश्यक सेवेचा विचार करता जव्हार येथील पतंगशाह कुटीर या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन क्रमप्राप्त होते. दिवंगत खा. चिंतामण वनगा यांच्या मागणीवरुन २०१२ मध्ये या रुग्णालयाला १०० खाटांहून २०० खाटांची मंजुरी मिळाली. मात्र, निधीचा मुहूर्त यंदा २०१९ मध्ये लागला आहे.
गिरीश महाजन यांच्या जव्हार भेटीच्यावेळी श्रमजीवी संघटनेने त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या होत्या, त्यावेळीही ही प्रमुख मागणी केली होती. त्यावेळी डॉ. तात्याराव लहाने हेही होते. यानंतर विवेक पंडित तसेच विनीत मुकणे यांनी याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता. अखेर राज्य शासनाकडून उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने ९० कोटी ६२ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.