बोर्डीत एका पोलिसाच्या पत्नीची हुंडाबळी विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 05:56 PM2018-02-01T17:56:17+5:302018-02-01T17:56:34+5:30
बोर्डीतील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या ई विंगमधील 207 रूममध्ये पोलीस नाईक सुनील खरात याच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय पत्नी शामल हिने बुधवार 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पालघर- बोर्डीतील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या ई विंगमधील 207 रूममध्ये पोलीस नाईक सुनील खरात याच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय पत्नी शामल हिने बुधवार 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या वेळी आरोपी बाजूच्याच खोलीत झोपला होता, या दाम्पत्याचा तीन वर्षीय मुलगा साहिल शाळेतून घरी आल्यावर त्याने डोअरबेल वाजवल्यावर आरोपी दरवाजा उघडण्यासाठी गेल्यानंतर सदर प्रकार लक्षात आल्याचे त्याने चौकशीत सांगितले. त्यानंतर शेजा-यांना बोलावून घटना प्रकार सांगितला, शिवाय मृतदेहजवळ 14 महिन्यांचा छोटा मुलगा पिऊंशी याला उचलून त्यांच्याकडे सोपवले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात फोन करून कळविले. सोसायटी सदस्यांनी घोलवड पोलिसांना खबर दिल्यावर त्यांनी घटनस्थळाहून मृतदेह आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. त्याच्यावर भादंवि कलम 304 ब आणि 306 नुसार गुन्हा नोंदवून अटक केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले. या खोलीतून मशिनगन आणि दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.
दरम्यान हा हुंडाबळी असल्याचा आरोप मयताच्या आईवडिलांनी करून चौकशीची मागणी केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह गुरुवारी सकाळी माहेरी नाशिक येथे नेण्यात आला. तर दोन्ही मुलं खरात कुटुंबीयांकडे आहेत. नलिनी पाटील यांच्या मालकीचा हा रूम असून हे दाम्पत्य मागील तीन वर्षांपासून येथे राहत होते. त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती. हुंड्याप्रमाणेच आरोपीच्या विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.