डहाणूत वीज बेपत्ता, डायमेकर्स,उद्योजक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:27 AM2017-12-09T00:27:56+5:302017-12-09T00:28:00+5:30
येथील पश्चिम किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावे, खेडोपाड्यातील वीज बेपत्ता झाल्याने डायमेकर्स, लघुउद्योजक व व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
शौकत शेख
डहाणू : येथील पश्चिम किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावे, खेडोपाड्यातील वीज बेपत्ता झाल्याने डायमेकर्स, लघुउद्योजक व व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बोईसर तसेच चिंचणी सबस्टेशनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने या परिसरात काळोख पडला आहे. या भागातील वीजपुरवठा एक तासही सुरळीत राहत नसल्याने त्यांना तास न तास वीजेची प्रतिक्षा करावी लागत आहे. कारखान्यातील कामगारांना सुट्टी द्यावी लागत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महावितरणचा कारभार जैसे थे असल्याने वीजेवर अवलंबून असलेल्या व्यवसायाची दयनीय अवस्था झाली आहे. डहणूच्या सागरी किनाºयावर असलेल्या चिंचणीपासून ते धाकली डहाणू वानगांव पासून अब्राहम, धूमकेत पर्यंतच्या सुमारे पन्नास गावांत डायमेकिंगसारखा ग्रामोद्योग आहे. शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता येथील हजारो सुशिक्षित तरूण डायमेकींगचा व्यवसाय करीत असतांना या परिसरात वीजपुरवठा सुरळित राहत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. सकाळी आठ वाजतापासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू असतांनाच बोईसर उपकेंद्रात सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याने सात, आठ तास वीज खंडित होण्याचे प्रकार दोन दिवसाआड घडत असल्याने येथील नागरिकही हतबल झाले आहेत. मात्र याकडे कोणताही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी किंवा नेतेमंडळी लक्ष देत नाहीत. तसेच ही समस्या सोडविण्यासाठी पुढे येत नसल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान एका बाजूला वीज निर्मिती करणारे थर्मलपॉवर स्टेशन दुसºया टोकावर तारापूर पॉवर स्टेशन आणि मधोमध असलेली गावे खेडोपाडे अंधारात खितपत आहेत. महावितरण कंपनी या परिसरात किती तास सुरळीत वीजपुरवठा होतो याबाबत कोणताही विचार न करता दरमहा दुप्पट, तिप्पट, बिले पाठवत आहे.