डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतली दिल्लीमध्ये हत्या झालेल्या श्रद्धाच्या कुटुंबाची वसईत भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:10 PM2022-11-17T19:10:55+5:302022-11-17T19:12:25+5:30
डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये हत्या झालेल्या श्रद्धाच्या कुटुंबाची वसईत भेट घेतली.
(मंगेश कराळे)
नालासोपारा : वसईत राहणाऱ्या श्रद्धा (२६) या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपी आफताब पुनावाला याने गळा आवळून हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याची घटना दिल्ली येथे घडली होती. या पीडित कुटूंबाला भेटण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्यांनी सदर गुन्ह्यासंदर्भात स्थानिक पोलिसांशी बोलण्यासाठी व गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी गुरुवारी दुपारी माणिकपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन पीडित कुटुंबियांचीही भेट घेतली. पण श्रद्धाच्या वडिलांनी पत्रकारांसोबत काहीही बोलण्यास नकार देत मीडियापासून लांब बरा असल्याचे बोलले. तिच्या घराच्या ठिकाणी माणिकपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
माणिकपूर पोलिसांच्या कामगिरीमुळे तपासाचे धागेदोरे लागले वर्षभरापासून वडीलांचा संपर्क श्रद्धासोबत कमी झाला होता. वाढदिवसाच्या वेळीही तिने कॉल उचलला नाही. त्यामुळे संपर्क होत नसल्याचे लक्षात आले. तसेच श्रद्धाच्या मित्रमैत्रिणीनेही संपर्क होत नसल्याचे त्यांना सांगितल्यावर संशय आला. तेव्हा ते सहाय्यक पोलीस आयुक्त आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी दखल घेऊन सहकार्य करत सदर प्रकरणाचे धागेदोरे तपासून या गुन्ह्याचा छडा लावला असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच श्रद्धाच्या वडिलांनी दिल्ली पोलीस चांगले असल्याचेही सांगितले.
आरोपी आफताब हा दृष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती होता. त्याने जे काही कृत्य केले ते प्रेमापेक्षा तिला मारून टाकण्याच्या टोकापर्यंत गेला त्यामुळे त्याला काय बोलायचे हे मला सुचत नाही. लव जिहाद बोलायचे की नाही बोलायचे हे पुढे जेव्हा दोघांचे संभाषण समोर येईल तेव्हा ते स्पष्ट होईल. पण एक स्पष्ट दिसते आहे की, आरोपीला श्रद्धाला हिंसक पद्धतीने मारताना त्याला काही वाटले नाही म्हणून त्याला लव शब्द कसे वापरणार ? हा लव नसून सूद आहे, खून आहे. त्यामुळे त्याला लव जिहाद कसे बोलायचे हे न्यायमूर्तीनी सर्व पुरावे बघून ठरवावे. त्याच्यावर आता बोलने योग्य नसल्याचे गोऱ्हे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच कोर्टात लवकरात लवकर केस चालवून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी असून दिल्ली येथील पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाने केला राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या या नराधमाला ही लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणाचा तपास जलद होउन फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच यापुढे ही राज्य महिला आयोग या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे.