डॉक्टर शशीबाला शुक्ला यांचे बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा मनपाने स्टींग ऑपरेशन करून केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:18 PM2023-06-21T19:18:46+5:302023-06-21T19:19:31+5:30
शहरातील प्रसिध्द डॉक्टर शशिबाला शुक्ला हे बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघड झाले आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) - शहरातील प्रसिध्द डॉक्टर शशिबाला शुक्ला हे बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी रात्री मनपाच्या आरोग्य विभागाने स्टींग ऑपरेशन करून या बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी डॉक्टर शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विजय नगरमध्ये डॉ शशीबाला शुक्ला यांचे आशिर्वाद क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. त्या डीएटएमस असून गेली ३५ वर्ष हा दवाखाना चालवत आहेत. मात्र ते या दवाखान्यात बेकायेदशीररित्या गर्भपात केंद्र चालवत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार वैद्यकीय विभागाचे डॉ पंडीतराव राठोड, डॉ अनाया देव, डॉ कृपाली फर्डे, मनोज यादव यांनी स्टींग ऑपरेशन केले. डॉ शुक्ला यांच्याकडे एक डमी रुग्ण पाठवला. डॉ शुक्ला यांनी कुठलीही सोनोग्राफी न करता त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यांना रंगेहाथ पथकाने पकडल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. डॉ शुक्ला यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात फसवणूक, बेकायदेशीर गर्भपात अधिनियम, औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसादन तसेच वैद्यकीय गर्भ समाप्ती अधिनियम २००३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्भपाताच्या गोळ्या फक्त एमबीबीएस स्त्रीरोगतज्ञ देऊ शकतो. परंतु डॉ शुक्ला यांच्याकडे कुठलही शैक्षणिक पात्रता नसल्याने त्या बेकायेदशीरपणे रुग्णांना गर्भपाताच्या गोळ्या देत होत्या. त्या ॲलोपॅथीच्या प्रॅक्टीसही करत होत्या. अशा प्रकारे गोळ्या देणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं, अशी माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी दिली. गेली ३५ वर्ष त्या क्लिनिक चालवत आहे. त्यामुळे हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रीरोग तज्ञांकडूनच गर्भपाता संदर्भात उपचार घ्यावेत असे आवाहन त्यांनी केेले आहे. त्री अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी कायदेशीर पडताळणी करून पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली आहे.