‘गटारी’ प्रकरण : भोसलेंची आज चौकशी
By admin | Published: August 9, 2016 02:09 AM2016-08-09T02:09:23+5:302016-08-09T02:09:23+5:30
भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांनी ३१ जुलैला मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शाळा क्र. १९ मध्ये ‘गटारी’ची पार्टी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
भार्इंदर : भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांनी ३१ जुलैला मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शाळा क्र. १९ मध्ये ‘गटारी’ची पार्टी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रभाग समिती-६चे अधिकारी वासुदेव शिरवळकर यांनी काशिमीरा पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी शिरवळकर यांना पत्राद्वारे समज दिली आहे. पालिकेने केलेल्या चौकशीतील कागदपत्रे व साक्षीदारांसह मंगळवारी हजर राहण्याचे फर्मान सोडले आहे.
प्रभाग क्र. ४६ मध्ये भोसले यांची आमदार नरेंद्र मेहता यांच्यामुळे नगरसेवकपदी वर्णी लागली. त्यानंतर, त्यांना प्रभाग सभापतीपदही मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी गटारीचा घाट घातला. त्यासाठी भोसले यांच्या परवानगीने भाजपा काशिमीरा मंडळाकडून सोशल मीडियावर पार्टीचे आमंत्रण देण्यात आले. त्यात गटारी पार्टीचा पत्ता महापालिका शाळेचा होता. त्यानुसार, समर्थकांनी ३१ जुलैला शाळेच्या परिसरात गर्दी केली. रविवार असल्याने शाळा बंद होती. परंतु, भोसले यांनी आपल्या पदाचा वापर करून चावी मिळवली. त्यानंतर, सर्वांनी डीजेच्या तालावर गटारी केली. तेथे शाळा असल्याचे भान उपस्थितांमधील कोणालाच राहिले नाही. ओल्या पार्टीने झिंगलेल्यांनी उष्टे-खरकटे, दारूच्या रिकाम्या बाटल्या व त्यांचे बॉक्स शाळेच्या आवारात सोडून पळ काढला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार शाळेचे कर्मचारी व शिक्षकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर, या पार्टीचे बिंग फुटले.
याप्रकरणी आयुक्त अच्युत हांगे यांच्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांनी केलेल्या चौकशीत ओल्या पार्टीसाठी शाळेच्या परिसराचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, हांगे यांनी भोसले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर, प्रभाग अधिकारी शिरवळकर यांच्या माध्यमातून महापालिकेने काशिमीरा पोलिसांत भोसले व मंडप कंत्राटदार राकेश पाटील यांच्याविरोधात शाळेच्या आवारात ओली पार्टी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी मोबाइलद्वारे शिरवळकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पत्र पाठवून समज देत चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)