दरोड्याआधीच टोळीला अटक, पद्मावती ज्वेलर्सवर टाकणार होते दरोडा, अनेक राज्यांत केले आहेत गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:15 AM2017-11-02T04:15:34+5:302017-11-02T04:15:57+5:30
डहाणू च्या पद्मावती ज्वेलर्स वर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आंतर राज्यीय टोळीतील कुख्यात पाच दरोडेखोरांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- हितेंन नाईक
पालघर : डहाणू च्या पद्मावती ज्वेलर्स वर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आंतर राज्यीय टोळीतील कुख्यात पाच दरोडेखोरांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३० आॅक्टोबर रोजी रात्रौ ३.३० वाजता डहाणू रोड स्टेशन वरील सागर नाका येथील पद्मावती ज्वेलर्सच्या समोर एक पांढºया रंगाची कार संशयास्पदरित्या उभी असल्याचे गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे, सहा. पो. उपनिरीक्षक भरत पाटील, नरेश जनाठे ह्यांना दिसली. त्यांनी त्या कार मधील पाच जणांची कसून चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्यांच्या कारची तपासणी केली असता बॅगेत हायड्रोलिक कटर, ड्रिल मशीन, लोखंडी कटावण्या, मिरची पूड इ.साहित्य आढळून आले.तात्काळ त्या सर्वाना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपण पद्मावती ज्वेलर्सवर दरोडा घालण्याच्या तयारीत असून समोरील देना बँकेच्या वॉचमनला बांधून ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.
ह्या प्रकरणात मोहम्मद हुसेन सिद्दीकी (वय ३२ वर्ष) रा.अहमदाबाद, जसाराम देवासी (२३ वर्ष)अश्विन ठाकूर (३२),गणेशराम चौधरी (२३), देवीलाल उर्फ देवजी चौधरी (२४) सर्व राहणार राजस्थान ह्यांना अटक केली आहे. हे आरोपी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वी अनेक महिने त्याची टेहळणी करून सर्व माहिती गोळा करायचे.
त्यांनी आतापर्यंत बँगलोर कॉटन पेठ हद्दीतील ज्वेलर्स दुकान, एल्फिस्टन रोड येथील रांका ज्वेलर्स, पालघरचे नॅशनल ज्वेलर्स, पिंपरी चिंचवड मधील अंबिका ज्वेलर्स, विक्र ोळी पार्क साईट मधील राजू ज्वेलर्स, राजस्थान दुजाना येथील ज्वेलर्स लुटल्याची कबुली दिली आहे. ह्या प्रकरणी डहाणू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्या असून आरोपींना न्यायालयाने ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ह्या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. मनोज चाळके, व बोईसर युनिटचे सहा. फौजदार विनायक ताम्हाणे, भरत पाटील,हवालदार दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, सचिन मर्डे, जनार्दन मते, रामचंद्र पाटील हे करीत आहेत.