मद्यपरवाने, नोटबंदीने उत्साह मावळला

By admin | Published: December 31, 2016 04:02 AM2016-12-31T04:02:31+5:302016-12-31T04:02:31+5:30

नोटाबंदीनंतर एक दिवसासाठी मद्य परवाना देण्यास बंदी घातल्याचा जबर फटका थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनला बसला आहे. पालघर जिल्हयातून अशा मद्य परवान्यासाठी

Drinking alcoholic drinks | मद्यपरवाने, नोटबंदीने उत्साह मावळला

मद्यपरवाने, नोटबंदीने उत्साह मावळला

Next

- शशी करपे, वसई
नोटाबंदीनंतर एक दिवसासाठी मद्य परवाना देण्यास बंदी घातल्याचा जबर फटका थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनला बसला आहे. पालघर जिल्हयातून अशा मद्य परवान्यासाठी २९ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत एकही अर्ज आला नव्हता. तर बहुतेक रिसॉर्टचालकांनी पार्ट्यां आणि करमणूकीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन फक्त १२ वाजेपर्यंत जेवण आणि साध्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. परिणामी यंदा ३१ डिसेंबरच्या व्यवसायात ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
दरवर्षी थर्टी फर्स्टच्या निमित्ताने वसईसह पालघर जिल्हयातील हॉटेल्स, रिसॉर्ट आधीच फुल्ल झालेली पहावयास मिळत होती. वसई, पालघर आणि डहाणू किनारपट्टीवर असलेली रिसॉर्टस आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवर असलेली अनेक हॉटेल्स महिन्याभरापूर्वीच बुक झालेली असायची. पहाटेपर्यंत विविध पार्ट्यांचेही आयोजन केले जात होते. पण, यंदा या सर्वांना फाटा देण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे आधीच पर्यटकांची संख्या रोडावल्याने रिसॉर्टच्या धंद्यात मंदी आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मद्य विक्री परवाना न देण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्याचा फटका थर्टी फर्स्टला बसलेला दिसत आहे.
हॉटेल्स, रिसॉर्टसह खाजगी पार्ट्या आणि टेरेसवर चालणाऱ्या पार्ट्यांनाही मद्य परवाना घेणे बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई केली जाते. असे असताना थर्टी फर्स्टच्या तोंडावर २९ डिसेंबरपर्यंत पालघर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांच्या कार्यालयात एक दिवसाच्या मद्य परवान्यासाठी एकही अर्ज आला नाही. परवान्यांशिवाय पार्टी अथवा समारंभात मद्याचा वापर करणे गुन्हा आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाते, अशी माहिती जिल्हा अधिक्षक बी. एम. लेंगारे यांनी दिली.
कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मद्य विक्रीवर बंधने घातल्याने बहुतेक रिसॉर्ट चालकांनी थर्टी फर्स्टच्या दिवशी कायदा न मोडता नेहमीप्रमाणेच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री १२ वाजेपर्यंतच रिसॉर्ट सुुरु ठेवली जाणार आहेत. तसेच सॉफ्ट म्युझिक, करमणुकीचे एकदम साधे कार्यक्रम आणि फक्त जेवण दिले जाणार आहेत. त्यासाठी दरातही कपात करण्यात आली आहे. यंदा गेल्यावर्षीच्या थर्टी फर्स्टच्या दरापेक्षा यंदाचे दर चाळीस टक्क्यांनी कमी ठेवण्यात आले आहेत. वसई तालुक्यातील अर्नाळा येथील २८ पैकी फक्त तीनच रिसॉर्ट चालकांनी १२ वाजेपर्यंतच्या करमणूक कराचे परवाने घेतले आहेत.
यंदा १२ वाजेपर्यंतच रिसॉर्ट सुुरु राहणार आहे. त्यात कोणतीही पार्टी होणार नाही. जेवण आणि सॉफ्ट म्युझिक शिवाय करमणुकीचे इतर कोणतेही कार्यक्रम असणार नाहीत. अनेक निर्बंधांमुळे रिसॉर्टचा व्यवसाय ३० टक्कयांनी घसरला आहे, अशी माहिती अर्नाळा बीच रिसॉर्टचे संचालक डॉ. नितीन थोरवे यांनी दिली. रिसॉर्टच्या धंद्यात प्रचंड मंदी असल्याने यंदाच्या थर्टी फर्स्टवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या धंद्यात मंदी आल्याने यावर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य व्यावसायिकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे अर्नाळा येथील आनंद रिसॉर्टचे संचालक फे डी बरबोज यांनी सांगितले. यामुळे यंदाचा जल्लोष कमी प्रमाणात जाणवेल.

- राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी खास पथके स्थापन केली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग विविध ठिकाणी असलेल्या चौक्यांवर कडक तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर हॉटेल्स, रिसॉर्ट, खाजगी पार्ट्यांसह बिल्डींगच्या टेरेसवर चालणाऱ्या पार्ट्यांवर अचानक धाड टाकून तपासणी करणार आहेत. त्यामुळे मद्य परवाने घेऊनच पार्ट्या करा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क खात्याचे पालघर जिल्हा अधिक्षक बी. एम. लेंगारे यांनी केले आहे.

- कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आणि गस्त वाढवण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी जारी केले आहेत. वाहनांच्या तपासणी बरोबरच डिंं्रक अँड ड्राईव्हवर पोलीस पथकांची नजर असणार आहे. त्याचबरोबर फिरते पथक विशेष गस्त घालणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

Web Title: Drinking alcoholic drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.