सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:52 AM2024-05-31T09:52:02+5:302024-05-31T09:53:00+5:30

एनडीआरएफचे पथक दाखल

Driver under pile with Poklen in Surya project excavation Rescue operation continued for 24 hours | सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच

सूर्या प्रकल्पाच्या खोदकामात पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली; २४ तासांपासून बचावकार्य सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क, विरार / नालासोपारा: एमएमआरडीएच्या माध्यमातून वसई खाडीजवळील ससूनवघर येथे सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाचे काम सुरू असताना प्रकल्पातील शाफ्टच्या खोदकामादरम्यान माती खचल्याने पोकलेनसह चालक ढिगाऱ्याखाली अडकला. या घटनेनंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून, एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.  राकेशकुमार यादव (वय ३२) असे जेसीबी चालकाचे नाव आहे.

वसई खाडी येथे टनल बोरिंग मशीनच्या साहाय्याने भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी टनल बोरिंग मशीन भूभागात सुमारे ३२ मीटर खोलीवर पोहोचवण्यासाठी लॉन्चिंग शाफ्टचे खोदकाम सुरू होते. हे काम सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून हाती घेण्यात आले होते, असे सांगण्यात आले. मात्र, ३२ पैकी सुमारे २० मीटरचे काम पूर्ण झाले असताना अचानक तेथील माती खचल्याने ही दुर्घटना घडली. 

सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न

या घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी उपलब्ध साधन आणि मनुष्यबळाचा वापर करून बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. यासोबतच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलिस दल, अग्निशमन दल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह स्थानिक प्रशासनास तातडीने सूचित करण्याबाबत आदेश दिले. एमएमआरडीएमार्फत बचावकार्य सुरू असताना एनडीआरएफची टीम पहाटे ५ वाजता घटनास्थळी पोहोचली. अडकलेल्या ऑपरेटरला सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. एमएमआरडीए, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.

व्हीजेटीआयची टीम नियुक्त

घटनेची तपासणी करण्यासाठी आणि  कारण शोधण्यासाठी एमएमआरडीएने व्हीजेटीआयमधील स्ट्रक्चरल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. अभय बांबोळे यांना नियुक्त केले आहे. प्रा. बांबोळे यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि लवकरच त्यांच्या निष्कर्षांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Driver under pile with Poklen in Surya project excavation Rescue operation continued for 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.