सारथ्य तिच्या हाती... परिस्थितीला न डगमगता टॅक्सी चालवून उदरनिर्वाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:03 AM2018-10-14T00:03:21+5:302018-10-14T00:08:54+5:30

जीवनाच्या प्रवासात दु:ख, निराशेचे अडथळे येणारच. पण म्हणून थांबून चालत नाही. उलट अशावेळी घाबरून न जाता कष्ट, जिद्द, आत्मविश्वासाचे स्टेअरिंग हाती धरले तरच पुढील मार्गक्रमण सोपे होते. याच सकारात्मक विचारातून येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करत कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी संगीता वंजारे यांनी टॅक्सीचे स्टेअरिंग हाती धरले आणि मुंबईतील पहिल्या महिला टॅक्सी चालक अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

Driving of life and car in his own hand | सारथ्य तिच्या हाती... परिस्थितीला न डगमगता टॅक्सी चालवून उदरनिर्वाह

सारथ्य तिच्या हाती... परिस्थितीला न डगमगता टॅक्सी चालवून उदरनिर्वाह

Next

- सागर नेवरेकर

संगीता वंजारे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातला. आई-वडील आणि पाच बहिणी. वडील बीएमसीत कामाला होते. सर्वकाही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच काळाने घाला घातला. वडिलांचे अकाली निधन झाले. हलाखीचे दिवस आले. मात्र, आईसह पाच बहिणी न डगमगता परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. मिळेल ते काम करू लागल्या. दरम्यानच्या काळात आईला बीएमसीत नोकरी मिळाली आणि परिस्थिती काहीशी सुसह्य झाली. या सर्व व्यापात संगीता यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांचे लग्न झाले.


सासरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. पण पैक्षांपेक्षाही मनाने, विचाराने श्रीमंत असलेले सासर त्यांना मिळाले. त्या नोकरी करू लागल्या. एकदा नवºयाशी बोलताना सहज गाडी चालविण्याचा विषय निघाला. गाडी चालविणे कठीण नाही यावर चर्चा झाली. यातूनच पहिली टॅक्सी कोण चालवायला शिकणार, अशी पैज लागली. गंमत म्हणून लागलेली ही पैजच पुढे सर्वसामान्य गृहिणी असलेल्या संगीता यांना मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक होण्याचा बहुमान देणारी ठरली.


सासू, खासगी कंपनीत सुरक्षारक्षक असलेले पती, आई, वरळी नाका-करी रोड शेअर टॅक्सी चालक-मालक संघटना या सर्वांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्यानेच लोअर परळ ते वरळी नाका या मार्गावरील महिला टॅक्सी चालक म्हणून माझा प्रवास सुखरूप सुरू आहे, असे संगीता यांनी सांगितले.


टॅक्सी चालविणे सोपे नाही. कधी कडाक्याचे ऊन तर कधी प्रचंड पाऊस. त्यातच वाहनांच्या लांबच लांब रांगांमध्ये होणारा खोळंबा. अशावेळी जेवण, नैसर्गिक विधी सर्वांचीच पंचाईत. शिवाय डोकं शांत ठेवून, कुठल्याही शॉर्टकटच्या मोहाला बळी न पडता टॅक्सी चालवावी लागते. जराजरी नजर विचलित झाली, स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले की अपघात ठरलेलाच. मात्र, संगीता संयमाने टॅक्सी चालवतात.

ठरवले तर स्त्री कुठल्याही क्षेत्रात यशस्वीपणे सारथ्य करू शकते. गरज असते ती केवळ स्वत:मधील आत्मविश्वास जागवण्याची. एकदा का तो जागा झाला की मग अवघड असे काहीच नसते. पण हो, या वाटेवरून पुढे जायचे असेल तर आत्मविश्वासासोबतच प्रामाणिक कष्टांचीही तयारी हवी. अतिआत्मविश्वास, अहंकार आपल्या जवळपासही फिरकणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

Web Title: Driving of life and car in his own hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत