डहाणूतील आदिवासींचे स्थलांतर, रोहयोची कामे कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:01 AM2019-03-07T00:01:24+5:302019-03-07T00:01:33+5:30
शेकडो आदिवासी कुटुंब रोजगारासाठी संजाण, भिवंडी, वाशी, पालघर, मुंबई, ठाणे, वापी, सिल्वासा येथे स्थलांतरित झाली आहेत.
डहाणू : तालुक्यातील जामशेत, केनाड, सायवन, रायपूर, बापूगांव, दिवशी, दाभाडी, चळणी, सुकटआंबा, बापुगाव, दादडे, मोडगाव, हळदपाडा, आंबेसरी, बहारे , धरमपूर , विवळवेढे चरी, बांधघर, निंबापूर, धरमपूर, रायपूर, धानिवरी, कोदाड, धानिवारी, चिंचले, आंबोली, शीसने, कारंज्विरा, ओसरविरा, आंबेसरी, कांदरवाडी, थेरोंडा, वेती, मुरबाड, घोळ, सोनाळे, खानीव, महालक्ष्मी, सारणी, पेठ, मोडगांव, धुंदलवाडी या गावातील शेकडो अदिवासी कुटुंब रोजगारासाठी संजाण, भिवंडी , वाशी ,पालघर , मुंबई, ठाणे, वापी, सिल्वासा येथे स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे अनेक गावे ओस पडली आहेत. विटभट्ट्यातून स्थलांतरित झालेली सर्वच आदिवासी कुटुंबे ही शासनाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून दारिद्र्यरेषेखाली जगणारी आदिवासी कुटुंब आहेत.
सध्या डहाणू तालुक्यातील ४२,७७८ जॉब कार्ड धारक आहेत. त्यात वन व कृषी अंतर्गत २७ कामे सुरू आहेत.त्यामध्ये १३२० मजूर कामावर आहेत. तर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ८५ ग्रामपंचायतीत रोजगार हमीची १४५ कामे सुरू असून केवळ ६९६ मजूर विविध गावात कामावर आहेत. त्यामुळे उद्योग बंदी उत्खनन बंदीमुळे डहाणू तालुक्यातील आदिवासी मजुरांना रोजगारासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात रानभाज्या विकून आणि शेतात मजूरीवर कबाड कष्ट करुन व मुला बाळांचे संगोपन करुन उदरिनर्वाह करतात. त्यानंतर मात्र रोजगार नसल््याने पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडावे लागते. दिवसभर उन्हाचे चटके अंगावर घेऊन घामा गाळत ही आदिवासी कुटुंबे मिळेल तिथे काम करुन राबराब राबतात. संपूर्ण रान पायाखाली घालून मोळ्या विकून घर चालवणाऱ्या आदिवासी कुटुंबाची वाताहत अद्यापही सुरुच आहे. त्या कुटुंबापर्यंत शासनाच्या योजना पोहोचलेल्याच नाही. दुर्बंल घटकांसाठी घरकुल योजना असूनही कुडाच्या भिंती, मोडकी गळकी घरे, फाटके छपर यात आदिवासी वर्षानुवर्षे आदिम जीवन जगत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या अभद्र नीतीमुळे आदिवासी समाज दुर्लंक्षित राहिला आहे. रोजगाराची हमी नसल््याने आदिवासी कुटुंबावर सतत स्थलांतरणाची वेळ येते आहे. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहून यांच्या मुलांची शिक्षणाची पाटीही कोरीच राहत आहे. सतत स्थलांतरामुळे आरोग्याकडे दुर्लंक्ष होऊन कुपोषणात वाढ होत आहे.
अठरा विश्वे दारिद्रय नशिबी असलेल्या भूमिहीन, अल्पभूधारक आदिवासी शेतमजूरांना पावसाळयात चार महीने शेतीचे काम पुरते मात्र या भागात रोजगार, उद्योग नसल्याने वर्षातले आठ महीने रोजगारासाठी वणवण भटकावे लागते. भरभटीच्या बांधकाम उद्योगातला शेवटचा आणि महत्वाचा घटक असलेल्या वीट उद्योगाकडे ते धाव घेतात. घरदार सोडून परजिल्ह्यात, तालुक्यात रोजगारासाठी स्थलांतर करतात. वीटभट्टीवर राबणाºयांची समस्या खूपच बिकट आहे. अशावेळी त्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याअभावी दुषित पाण्यावर तहान भागवावी लागते. ताप, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या, खरु ज रक्तांचे प्रमाण कमी, वजन कमी आदी आजार दिसून येतात. कुपोषण तर सगळ्यांनाच छळत असते.
>स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. त्यांना जॉब कार्ड देण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीकडून ,शासनाकडून त्याची जिहर्तही केली जाते. मागणी नुसार रस्ते,विहिरी,घरकुलाचे कामे दिली जातात. मात्र लोकांची मानिसकता रोख कमाई कडे असल्याने वीटभट्टी, एम आय डी.सी कडे जास्त आहे.
-बी.एच. भरक्षे, गट विकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती