डहाणूच्या बाजारात सुक्या बोंबलाचा दुष्काळ
By admin | Published: July 3, 2017 05:51 AM2017-07-03T05:51:47+5:302017-07-03T05:51:47+5:30
सागराशी झूंज देऊन रात्र दिवस कष्ट करणाऱ्या डहाणू ते झाई पर्यंतच्या हजारो मच्छिमारांना गेल्या वर्षभरात समुद्रात अनेक फेऱ्या मारूनही
शौकत शेख/लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : सागराशी झूंज देऊन रात्र दिवस कष्ट करणाऱ्या डहाणू ते झाई पर्यंतच्या हजारो मच्छिमारांना गेल्या वर्षभरात समुद्रात अनेक फेऱ्या मारूनही पूरेशा प्रमाणात मासे न मिळाल्याने त्यांच्यावर कर्ज बाजारी होण्याची पाळी आली आहे. त्यातच मच्छिमारांना हमखास वैभव मिळवून देणाऱ्या बोंबिलाची मासेमारी अत्यल्प प्रमाणात झाल्याने सध्या चिंचणी डहाणू ते झाई पर्यंतच्या मासळी बाजारातून सूका बोंबिल गायब झाल्याने गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांची पंचाईत झाली आहे.
दरम्यान दिव, वेरावळ, तसेच कच्छ, सौराष्ट्र बंदरातून मोठया प्रमाणात डहाणूत सूके बोंबिल येत आहे. डहाणूच्या बोंबिलाच्या तुलनेत प्रति चारशे रूपये किलो विक्री होणाऱ्या या बोंबिलाला सध्या मागणी वाढत आहे. मुंबई महानगरापासून केवळ १२५ कि.मी. अंतरावर डहाणू हे नावाजलेले व प्रगतशिल बंदर आहे. येथील चिंचणी पासून ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर हजारोच्या संख्येने राहणाऱ्या मच्छिमारांचा मासेमारी हा एकमेव व्यवसाय असून या भागांत सुमारे सहाशे ते सातशे लहान मोठया बोटी कव, वगरा व डालदा या तीन पध्दतीने प्रामुख्याने मासेमारी करीत असतात.
विशेष म्हणजे मासेमारीच्या हंगामात घोळ, दाढा, शिवंड, सरंगा, सुरमई इत्यादी मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाची असलेली मासळी या भागात सापडते. शिवाय आॅक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा बोंबिलाचा मासेमारीचा हंगाम असतो. येथील सूक्या बोंबिलाला, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणात मागणी असल्याने येथील मच्छिमारांचे संपूर्ण कुटुंब तीन महिने रात्रदिवस मेहनत करीत असतात.
शिवाय शासनाचे मच्छिमारांप्रति असलेले उदासीन धोरण इत्यादी करणांमुळे मासेमारी व्यवसाय संपूष्टात येण्याची चिन्हे दिसत आहे. वर्षभरात महागडे मासे तर सोडा पूरेशा प्रमाणात बोबिलाची ही मासेमारी न झाल्याने मच्छिमार अडचणीत आहे.