पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ, बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:07 PM2019-11-05T23:07:48+5:302019-11-05T23:07:54+5:30

बळीराजा हवालदिल : लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी

Drought in Palghar district, farmer in tress | पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ, बळीराजा हवालदिल

पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ, बळीराजा हवालदिल

Next

पारोळ : परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील जवळपास ७७ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले असून भातपीक आणि भाताचे तणही खराब झाल्याने स्वत:च्या खावटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ओल्या दुष्काळाची गडद छाया शेतावर पडली असून अस्मानी संकटाने हवालदिल झालेला बळीराजा आता नुकसान भरपाईसाठी प्रशासनाकडे आशेने बघतो आहे.

जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, वसई तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हे भाताचे वाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने उत्पन्न चांगले होते. मात्र परतीच्या पावसाने या सोन्यासारख्या भात पिकाचे होत्याचे नव्हते केले. दहा दिवसांपूर्वी कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली. कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता पुन्हा परतीच्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आठ-दहा दिवस सतत पडतच राहिल्याने कापून ठेवलेले भात पीक शेतात जसेच्या तसेच पडून आहे. पावसाने करपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगू लागली आहेत.
भात पीक खराब झाले तर पावसात भाताचे तण काळभोर पडल्याने तेही वाया गेले. यामुळे वर्षभराचा जनावरांना चारा कुठून आणायचा हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे. या पावसाचा फटका फूल तसेच फळ बागायतीलाही बसला. वसई परिसरात जाई, जुई, मोगरा ही फुले पावसात भिजल्याने भातशेती बरोबर बागायतीचेही मोठे नुकसान झाले.

रब्बी पिकांवरही परिणाम
भात पिकाची कापणी होताच शेतकरी रब्बी पीक घेण्याच्या तयारीला लागतो. दिवाळीच्या सुमारास वाल, मूग, याची शेतात पेरणी केली जाते. तर तूर शेताच्या बांधावर लावतात. जिल्ह्यात टोमॅटो, सफेद कांदा, वांगी, भेंडी, काकडी, मिरची इ. पिकांचेही उन्हाळ्यात उत्पादन घेतले जाते. दसºयाच्या दरम्यान रोप तयार करून दिवाळीनंतर लगेच या पिकांची लागवड करतात. पण यंदा पावसामुळे अनेक दिवस भात पीक शेतात राहिले तर जमीनही ओली राहिल्याने महिनाभर तरी पिकांची लागवड करता येणार नाही.

Web Title: Drought in Palghar district, farmer in tress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.