दुष्काळी तालुके, सुट्टी पोषण आहारातून वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 11:59 PM2019-05-08T23:59:20+5:302019-05-08T23:59:56+5:30
राज्यात बहुतांश जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार , पालघर, विक्र मगड, तलासरी आणि वसई तालुक्यातील 35 गावे शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत.
- रविंद्र साळवे
मोखाडा - राज्यात बहुतांश जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार , पालघर, विक्र मगड, तलासरी आणि वसई तालुक्यातील 35 गावे शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. शालेय सुट्टी त दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी या तीन तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहार राबविण्याचे आदेश पालघर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु, अतिदुर्गम , कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या आणि दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या जव्हार, मोखाडा या दोन्ही तालुक्यांना वगळण्यात आले आहे.
दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शासन विविध उपाययोजना करित आहे. त्याचाच एक भाग, दुष्काळग्रस्त भागातील कुटुबांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय सुट्ट्यांमध्ये, शालेय पोषण आहार ( मध्यान्ह भोजन ) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा दुष्काळग्रस्त भागांना होईल.
पालघर जिल्ह्यात पालघर, विक्र मगड, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातील 35 दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. मात्र, शालेय सुट्टी त, शालेय पोषण योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील पालघर, विक्र मगड आणि तलासरी या तालुक्यांनाच ही योजना लागू असल्याचे आदेश , जिल्हा शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिले आहेत. त्यामुळे जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम आणि कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या तालुक्यांना शासनाने दुर्लक्षित ठेवुन अन्याय केल्याचा आरोप पालकांनी केला.
मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १६५ शाळा आहेत. त्यामध्ये पहिली ते पाचवी पर्यत - ७६८५ आणि 5 ते 8 वी पर्यंत ३६१३ असे एकूण ११ हजार २९८ विद्यार्थीं शालेय पोषण आहार योजनेसाठी लाभार्थी आहेत तर जव्हार तालुक्यात वीस हजारांहून अधिक विद्यार्थी लाभार्थी आहेत. मुळातच हे दोन्ही तालुके दुष्काळाच्या दाहकतेत होरपळून निघत आहेत.
पाणी टंचाई आणि स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या अभाव, यामुळे येथे मोठे स्थलांतर होत आहे. त्यामुळे येथे सुट्टीच्या काळात शालेय पोषण आहार योजना राबविणे आवश्यक असतांना, आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदिप वाघ यांनी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्याचे निवेदनं दिले आहे.
शासनाकडून जिल्ह्यातील पालघर, विक्र मगड आणि तलासरी या तीन तालुक्यांना सुट्टी च्या काळात शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांना आदेश देण्यात आले आहेत. तर जव्हार आणि मोखाडा या दोन्ही तालुक्यांची नावे शासनाकडून कळविण्यात आलेली नाहीत.
- राजेश कंकाळ, जिल्हा शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा परिषद