दारूच्या नशेत जावायाने केला सासूवर जीवघेणा हल्ला, जखमी सासूचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 09:39 PM2023-02-25T21:39:32+5:302023-02-25T21:41:25+5:30
हत्येचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- दारूच्या नशेत जावायाने ६० वर्षीय सासूवर चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. राजू पवार (३५) असे आरोपी जावायाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास विरारच्या गडगा पाडा येथे राहणाऱ्या वंदना पवार (३३) आणि त्यांची मुलगी घरातील अंथरुणावर झोपलेल्या होत्या. वंदना यांची आई रेश्मा दळवी (६०) ही त्यांच्याशेजारी जेवत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी राजू पवार (जावई) मद्यधुंद अवस्थेत येऊन पत्नी वंदना आणि सासू रेश्मा या दोघींना शिवीगाळ करत घरात आला. त्याने घराच्या पडवीला अडकवलेला चाकू काढून पत्नीवर चाकूने हल्ला करण्याच्या उद्देशाने धावला. तेव्हा शेजारी बसलेली सासू तिच्या मदतीला धावली. त्यानंतर मद्यधुंद आरोपी राजू पवार याने सासूच्या मानेवर वार करून घटनास्थळावरून पळ काढला. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सासूला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान सासूचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पतीविरुद्ध मारहाण, खुनी हल्ला आणि धमकावल्याचा गुन्हा पत्नी वंदना पवार यांनी विरार पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. विरार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.
सासुवर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी जावईवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून शनिवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"