वसई-विरारच्या रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 11:58 PM2021-04-18T23:58:36+5:302021-04-18T23:58:45+5:30
कोरोना रुग्णवाढीची नागरिकांमध्ये पसरली भीती : वाहनांचीही वर्दळ घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : कोरोनामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लावून शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे वसई-विरारमध्ये शनिवारनंतर रविवारीही नागरिकांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वतःहून घरीच थांबल्याने कडक लॉकडाऊन यशस्वी झाला आहे. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नसल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
पोलिसांनी नालासोपाऱ्याच्या संतोष भवन, प्रगती नगर, एव्हरशाईन, गाला नगर, अलकापुरी, नागीनदास पाडा, तुळींज ओव्हर ब्रिजच्या खाली, सिविक सेंटर, हेगडेवार चौक, धनंजय स्टॉप या ठिकाणी चोख बंदोबस्त लावून नाकाबंदी करत रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करत होते.
तुरळक रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहन, दुचाकी यांची पोलीस तपासणी करत होते. वाहनांची कागदपत्रे, वाहन परवाना, रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचे आयडी कार्ड तपासणी केली जात होती.
एरव्ही नालासोपारा पूर्वेकडील परिसरातील रस्त्यावर पाय ठेवण्यासाठी नागरिकांना जागा मिळत नसलेल्या रस्त्यावर रविवारी शुकशुकाट पसरला होता. दोन्ही झोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, प्रशांत वाघुंदे यांनी सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पेट्रोलिंग करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. विनाकारण फिरणाऱ्यांना घरात बसण्याची पोलिसांनी विनंती केली. दरम्यान, वसई, अर्नाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनाऱ्यांवर बंदमुळे संपूर्ण शुकशुकाट पसरला असल्याचे पाहायला मिळाले.
वाहतूक पोलिसांची कारवाई
शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर केसेस करून दंड वसूल करण्यात आला आहे. शनिवारी विरार आणि वसई या दोन झोनमधील वाहतूक पोलिसांनी विदाऊट सीट बेल्ट, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, विनालायसन्स, रिक्षांवर कारवाई, नो पार्किंग अशा केसेस केल्या आहेत. वसई वाहतूक विभागाने ३३१, तर विरार वाहतूक विभागाने २२५ केसेस केल्या आहेत.