एटीएममध्ये फसवणूक करणारी दुक्कल ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:57 AM2020-03-03T00:57:16+5:302020-03-03T00:57:19+5:30
एटीएम कार्डांची हातचलाखीने बदली करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणा-या दुकलीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पकडले आहे.
नालासोपारा : एटीएममध्ये पैसे काढायला जाणाऱ्या लोकांची दिशाभूल करून त्यांच्या एटीएम कार्डांची हातचलाखीने बदली करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणा-या दुकलीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. त्यांच्याकडून १५ गुन्हे उघड करून ५३ एटीएम कार्ड जप्त करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी गुजरात राज्यात १० ठिकाणी आणि महाराष्ट्रात ५ ठिकाणी असे प्रकार उघड केल्याचे सांगितले आहे.
वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडील रतनदीप स्टुडिओजवळील चिंचोटी गावातील गोडातपाडा येथे इंद्रकुमार बिहारी शाहू (२८) याची सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी अशाचप्रकारे एटीएमच्या सहाय्याने फसवणूक झाली होती. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. त्याआधारे राजवीर हसमुख भट (२८) आणि जितेंद्र अखिलानंद तिवारी (३७) या दोघांना पकडले.
>वसई न्यायालयात हजर केले असता दोन आरोपींना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपल्या हद्दीमध्ये त्यांनी दोन गुन्हे केले असल्याने न्यायालयाकडून परत त्यांचा ताबा घेणार आहे.
- ज्ञानेश फडतरे, तपास अधिकारी आणि सहा. पोलीस निरीक्षक,
गुन्हे प्रकटीकरण शाखा,
वालीव पोलीस ठाणे