साखरेची वाहिनी फुटल्याने २९ गावांचा पाणीपुरवठा ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 11:36 PM2019-05-01T23:36:33+5:302019-05-01T23:37:28+5:30
रस्त्याचे काम करतांना लागला धक्का : पाच दिवस झाले निर्जळी
डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, खेडोपाडयांना पाणी पुरवठा करणाऱ्या बाडापोखरण पाणी पुरवठा योजनेची साखरे जवळील मुख्य जलवाहिनी एका खाजगी ठेकेदाराने रस्त्याचे काम करीत असतांना फोडल्याने गत पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. एवढे होऊनही पंचायत समिती, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण किंवा जिल्हापरिषदेच्या पाणी पुरवठा विभाग तातडीने ती दुरुस्त न केल्याने प्रचंड हाल सुरु आहेत. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.
डहाणूच्या बंदरपट्टी भागातील वाणगांव, कतेरवाडी, बावडा, चिंचणी, तारापूर, धाकटी डहाणू व परिसरातील नागरिकांना वानगांव जवळील साखरे धरणातून बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केले जाते. परंतु २००६ पासून येथील लोकांना दोन, चार, आठ दिवस आड पाणी पुरवठा केले जाते. त्यामुळे अधून मधून वीज पुरवठा खंडीत झाल्यास किंंवा रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाल्यास रस्त्याच्याकडेला असलेली जलवाहिनी फुटल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागते.
गेल्या रविवारी साखरे-वाणगांव रस्त्यावरील रस्त्याचे काम सुरु असतांना एका खाजगी ठेकेदाराने बाडापोखरणची मुख्य जलवाहिनी आठ ते दहा इंच फोडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला. विशेष म्हणजे बाडापोखरणची जलवाहिनी अे.सी. दर्जाची असल्याने या भागांत तिच्या दुरुस्तीचे साहित्य मिळत नाही. त्यामुळे जलवाहिनी दुरूस्त करतांना तीन दिवसांचा कालावधी झाला तरी अद्याप पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या जीवन प्रधिकारण, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष न दिल्याने पाणी पुरवठा केंव्हा सुरू होईल ते सांगता येत नाही.
दरम्यान या पूर्वी तानसी धूमकेत येथेही रस्त्याच्या ठेकेदाराने काम करतांना जलवाहिनी फोडली होती, मात्र ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नाही.
साखरे येथे जलवाहिनी दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू असून आज संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल. - आर. ए. पाटील, उप अभियंता, डहाणू जिल्हा परिषद, पाणीपुरवठा विभाग