डेंग्यूच्या दहशतीमुळे गावपळण, बाळकापरा गाव झाले रिते, जव्हार रुग्णालयात १५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:17 AM2017-12-03T02:17:33+5:302017-12-03T02:17:43+5:30
तालुक्यातील बाळकापरा गावातील डेग्यूची साथ वाढली असून जव्हार रुग्णालयातील लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १५ वर पोहचला आहे.
जव्हार : तालुक्यातील बाळकापरा गावातील डेग्यूची साथ वाढली असून जव्हार रुग्णालयातील लागण झालेल्या रुग्णांचा आकडा १५ वर पोहचला आहे. यापैकी बाळकापरा गावातील धवळी देवू भोये (४०) या महिलेची रुग्णालयात उपचार घेतांना परिस्थिती अत्यंत खालावल्याने तिला नाशिकच्या रु ग्णालयात हलविण्यात आले आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डेंग्यूच्या या दहशतीमुळे गावकरी गावात थांबायला तयार नसल्याने गाव जवळपास रिकामे झाले आहे.
बाळकापरा गावात एक डॉक्टर, दोन नर्स, वार्डबॉय अशी दिवसरात्र पथकाची नेमणूक करण्यात आली असून, रुग्णांवर गावात तात्काळ प्राथमिक उपचार करून त्यास जव्हारच्या रु ग्णालयात पाठविण्यात येते. गावातील साथीच्या आजाराची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्हा परिषद सदस्य गुलाब राऊत आणि माजी पं. स. सदस्य विनायक राऊत यांनी गावाची पाहणी करून रूग्णांवरील उपचाराची माहिती घेतली.
या गावात आजही डेंग्यूची साथ सुरूच आहे. त्यामुळे बहुतेक गावकºयांनी गाव सोडले आहे. तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांनी बाळकापरा गावात वैद्यकिय उपचाराची पाहणी केली आहे. गावाच्या आजूबाजूच्या गावांना डेंग्यूची साथ पसरू नये, म्हणून बाजूच्या गावातील आजारी रुग्णांवरही उपचार करण्यात आल्याचे तेथील वैद्यकिय पथकाने लोकमतला सांगितले. त्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासून रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
बाळकापरा गावात डेंग्यूची लागण झाल्यावर ताप येणे, गुढग्यातील सांधे दुखणे, डोकेदु:खी, हातपाय चावणे, हिवतापा प्रमाणे थंडी भरणे असे लक्षणे असून, आजही या गावात रोजच चार ते पाच रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जव्हारच्या ग्रामीण रु ग्णालयात १५ साथीचे रु ग्ण उपचार घेत आहेत.
बाळकापरा व कासटवाडी या ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीन (धूर फवारणी यंत्र) वेळेच उपलब्ध न झाल्याने या साथीला पायबंद घालता आला नाही. या आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पाणी साठवून ठेवू नये आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
बाळकापरा गावातील पिण्याच्या पाण्याचे विहिरीचे पाणी तपासणीसाठी वेळोवेळी पाठवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच शनिवारीही डेंग्यूचे ३ संशियत रुग्ण आढळले आहेत.
तातडीची पाहणी
बाळकापरा गावाची व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थानांना साथीची लागण होवू नये तसेच बाळकापरा गावाची परिस्थिती नियंत्रणात यावी आणि शासनाच्या आरोग्य विभागाने लक्ष घालावे म्हणून जि. प. सदस्य गुलाब राऊत आणि माजी पंचायत समिती सदस्य विनायक राऊत यांनी गावाला बाजूच्या गावांना तात्काळ भेट देवून पाहणी केली. जव्हारच्या कुटीर रुग्णांनालयातील रुग्णांची पाहणी करून औषधे व इतर उपचरासाठी आर्थिक मद्दत करण्यात आली.