महा ई सेवा केंद्रातूनच मिळाले बनावट दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:19 AM2018-02-22T00:19:06+5:302018-02-22T00:19:09+5:30
महा ई सेवा केंद्र चालवणा-या एका व्यक्तीने नायब तहसिलदारांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे
शशी करपे
वसई : महा ई सेवा केंद्र चालवणाºया एका व्यक्तीने नायब तहसिलदारांच्या खोट्या सह्या करून बोगस दाखले विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याने आठ बोगस दाखले विकल्याची लेखी कबुली दिली आहे. हे महा ई सेवा केंंद्र बंद करण्याची शिफारस तहसिल कार्यालयातून करण्यात आली आहे.
सेतू कार्यालयातून अधिवास, उत्पन्न, जात प्रमाणपत्र यासह विविध दाखले दिले जातात. त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, निवासी दाखला, आधार कार्डासह कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज असते. मात्र, नालासोपाºयातील महा ई सेवा केंद्र चालवणाºया विपुल राऊत याने कोणतीही कागदपत्रे न घेता निवासी नायब तहसिलदार स्मिता गुरव यांच्या खोट्या सह्या करून दाखले विकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याने आतापर्यत आठ दाखले दिल्याची कबुली दिली आहे. मात्र त्याने नक्की कोणते दाखले दिले याची माहिती दिलेली नाही. त्याने रिक्षा परमीटसाठी परप्रांतियांना अधिवास दाखले विकल्याचा संशय आहे. तो पंचवीस हजारात कागदपत्रे नसतांनाही बोगस दाखले विकत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तक्रार आल्यानंतर सर्व महा ई सेवा केंद्र चालकांना बोलावून चौकशी करण्यात आली असता राऊतने माहिती देण्यास टाळाटाळ केली होती.