पॅनकार्ड नसल्याने महिला बचत गटांची बिले रखडली
By Admin | Published: March 21, 2017 01:37 AM2017-03-21T01:37:23+5:302017-03-21T01:37:23+5:30
महिला सबलीकरणासाठी वसई विरार महापालिकेने ८३ महिला बचत गटांना १३८ उद्यानांच्या देखभालीचे काम दिले आहे. मात्र,
वसई : महिला सबलीकरणासाठी वसई विरार महापालिकेने ८३ महिला बचत गटांना १३८ उद्यानांच्या देखभालीचे काम दिले आहे. मात्र, यातील अनेक बचतगटांकडे पॅनकार्ड नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून त्यांची बिले थकली आहेत. परिणामी आर्थिक कोंडी झाल्याने शेकडो महिलांना कामाचा मोबदला मिळू शकलेला नाही.
वसई विरार महापालिकेत बीपीएल आणि एपीएलअंतर्गत अडीचशेहून अधिक महिला बचत गट नोंदवले गेले आहेत. तसेच काही महिला बचत गट दारिद्रय रेषेखालील असून सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत स्थापन झालेले आहेत. महापालिकेत नोंदणी झालेल्या २५० पैकी ८३ महिला बचत गटांना शहरातील ८३ उद्यानांचे देखभालीचे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१६ रोजी तसे करारनामे करण्यात आले होते. मात्र, कार्यादेश नोव्हेंबर २०१६ मध्ये देण्यात आले. करारनाम्यानुसार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत त्यांच्या कामाचा मोबदला दिला पाहिजे. पण, पाच महिन्यांनी काही महिला बचत गटांना डिसेंबरपर्यंतचा मोबदला अदा करण्यात आला आहे. शेकडो महिलांना दरमहा मोबदला मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार भाजपाचे वसई शहर अध्यक्ष मारुती घुटूकडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महिला बचत गटात घरकाम, मोलमजुरी करणाऱ्या गरीब घरातील महिला आहेत. त्यांंनी आपापली कामे सोडून बचत गटाच्या माध्यमातून उद्यान देखभालीचे काम हाती घेतले आहे. पण, पाच महिने उलटल्यानंतर महापालिकेने बचत गटांना पॅनकार्ड जमा केल्यानंतर मोबदला दिला जाईल असे सांगून बिले थकवली आहेत. ठराविक महिला बचत गटांकडेच पॅनकार्ड आहेत. बऱ्याच बचत गटांकडे ते नसल्याने त्यांची बिले थकली आहेत.
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने त्यांना पॅनकार्ड मिळणे कठीण झाले आहे. त्यांची आर्थिकक कोंडी झाल्याची तक्रार आहे. दरम्यान, महिला बचत गटांना पॅनकार्ड काढण्यासाठी मदत केली जात आहे. त्यामुळे अनेक गटांना पॅनकार्ड मिळू लागली आहेत. (प्रतिनिधी)