कमळ तलावाची झाली गटारगंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:44 AM2018-12-20T05:44:52+5:302018-12-20T05:45:09+5:30
सांडपाणी रोखणार कोण : तक्रारी करुनही डहाणू नगरपंरिषदेचे दुर्लक्ष
डहाणू : नगरपरिषद हद्दीतील पारनाका येथील श्री शंकर मंदिरालगत असलेल्या कमळ तलावाला उतरती कळा लागली असून सांडपाण्यामुळे हा तलाव प्रदूषित झाला आहे. परिणामी या तलावातील जलचर शृंखलेला बाधा निर्माण झाली आहे. स्थानिक रहिवासी व पर्यावरण प्रेमींनी याबाबत नगरपरिषद कार्यालयात तक्रारी केल्या असून प्रशासनाने अजूनही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने डहाणूतील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लाल रंगांच्या सुंदर कमळ फुलांसाठी हा तलाव विशेष ओळखला जातो. लागूनच शंकर महादेवाचे मंदिर असून तेथे भाविकांची सातत्याने वर्दळ असते. तसेच, पश्चिमेला चिकू नारळाच्या वृक्षांची गर्द हिरवळ झाडी असल्याने या तलावाची शोभा न्याहालण्यासाठी डहाणूचे रहिवासी आणि पर्यटक येथे क्षणभर विसावा घेण्यासाठी आवर्जून थांबतात. बाजूलाच सिनेमागृह असल्याने या परिसरात लोकांची वहिवाट नेहमीच असते. परंतु आजूबाजूला असलेल्या काही निवासी संकुलातील सांडपाणी तलावात सोडले जाते.
तलावाच्या पाण्यात जलपर्णीमुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेवाळचा थर पाण्याचा पृष्ठभागावर वाढल्याने लाल कमळ फुले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे तलावाच्या सौंदर्याला प्रदूषणाची दृष्ट नजर लागल्याने दिवसेंदिवस त्यास अवकळा आली आहे. नगरपरिषद प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. स्वच्छ डहाणू, सुंदर डहाणू निर्मितीसाठी फलकबाजी न करता ठोस उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.
‘स्वच्छ डहाणू, सुंदर डहाण’ ही कल्पना कागदावरच
च्अशाच प्रकारे धाकटी डहाणूकडे जाणाऱ्या मार्गालगत मशिदी जवळील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे हा तलावाचे विद्रुपीकरण झाल्याचे चित्र आहे.
च्डहाणू शहरातील कंक्र ाडी नदीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढल्याने तसेच, नदीपात्रात घाण, सांडपाणी, केरकचरा टाकल्याने या नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.
च्तलाव, नदी, नाले यांचे प्रदूषण होत असल्याचे चित्र दिसत असल्याने स्वच्छ डहाणू, सुंदर डहाणू ही निव्वळ वल्गना ठरण्याची चिन्हे आहेत.
वर्ष २०१४-१५ पासून अनेकदा नगरपरिषदेला या तलावाच्या प्रदूषण प्रतिबंधाबाबत निवेदने देवूनही कार्यवाही केली नाही. मुख्याधिकाºयांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. परंतु अजूनही कार्यवाही होत नाही. या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षण संस्थांनाही तक्र ारी केल्या आहेत. सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रि या उमटल्या आहेत.
-अमित सोरठी, स्थानिक रहिवासी
या तलावाच्या स्वच्छतेबाबत नगरपरिषदेत ठराव मांडणार आहे. लवकरच या तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे प्रशासनाला सूचित करणार आहे.
-वासू तुंबडे, स्थानिक नगरसेवक