एमआयडीसीने वॉटर कनेक्शन न दिल्याने अद्ययावत शौचालय ६ महिने पडून
By admin | Published: January 23, 2017 05:11 AM2017-01-23T05:11:36+5:302017-01-23T05:12:05+5:30
तारापूर एम आय.डी.सी मधील कॅम्लीन नाक्यावर जेएसडब्ल्यूने उभारलेल्या स्टेनलेस स्टीलच्या अद्यावत शौचालयाला एमआयडीसीने
पंकज राऊत / बोईसर
तारापूर एम आय.डी.सी मधील कॅम्लीन नाक्यावर जेएसडब्ल्यूने उभारलेल्या स्टेनलेस स्टीलच्या अद्यावत शौचालयाला एमआयडीसीने पाणी पुरवठा देण्यास विलंब लावल्याने ते सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानालाच एमआयडीसीने तिलांजली दिली आहे.
एमआयडीसीनेच हे शौचालयाचे उभारण्याकरीता प्लॉट उपलब्ध करून दिल्यानंतर जेएसडब्ल्यूने सुमारे ४५ लाख खर्चून ते उभारले. मात्र त्याला लागणाके वॉटर कनेक्शन देण्याचा प्रस्ताव लाल फितित अडकल्याने ते तसेच पडून आहे.
उभारलेल्या या संकुलावर सौजन्य जेएसडब्ल्यू बरोबर एमआयडीसीचेही नाव ठळकपणे लिहिले आहे. पाणी पुरवठयाचा हा प्रश्न व त्यातील तांत्रिक अडचणी एमआयडीसीने सोडविला असता तर हा विलंब निश्चितपणे टाळता आला असता तर या अद्यावत सुलभ शौचालयाचा विनामूल्य वापर स्त्री, पुरु ष आणि अपंगानाही करता येणार असून सदर शौचालयात इंडियन आणि कमोड पॉट बरोबरच यूरिनसाठी असलेले भांडेही उच्च प्रतिच्या स्टेनलेस स्टीलचे आहे त्यामुळे ते कायम स्वछ राहणार असून सर्वांच्या सोयीचा आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असा उपक्र म आहे.
तारापूर एमआयडीसीमधील कॅम्लीन नाका हा औद्योगिक वसाहतीतिल मुख्य रस्त्यावरील मध्यवर्ती असलेला सर्वात रहदारीचा असून त्यावर मालवाहतूक करणाऱ्या छोट्या- मोठ्या टेंपो, अवजड क्रेनच्या वाहनतळ बरोबरच सहा व तीन सिटर रिक्षा आणि एसटी बसचाही स्टॉप असल्याने त्या नाक्यावर माणसांची प्रचंड प्रमाणात ये जा असते त्यामध्ये महिला प्रवासी संख्याही जास्त असते.
या नाक्यावर स्वच्छ्तागृहा अभावी पुरूषां बरोबरच स्त्रियांचीही मोठी कुचंबणा होत असल्याने त्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने तसेच स्वच्छता भारत अभियानाला हातभार लागावा, या स्वच्छ हेतूने उभारलेले सुलभ शौचालय सहा महिन्या पासून धूळ खात पडल्याने सर्वत्र संताप व आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे. या संदर्भात जेएसडब्ल्यू स्टील च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी सदर सुलभ शौचालय लवकरच सुरु करण्यात येईल एवढेच सांगितले.