बहुरंगी लढतींमुळे उमेदवारांमध्ये धाकधूक, कुणाच्या पारड्यात जय, कुणाच्या नशिबी पराजय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:36 AM2020-01-08T01:36:23+5:302020-01-08T06:53:48+5:30
पालघर जिल्हा परिषदेच्या ५४ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले.
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या ५४ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये युती आणि आघाडी न झाल्याने तसेच काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी जोर लावल्याने बहुरंगी लढती झाल्या आहेत. यामुळे अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सकाळी सर्वच भागात थंड प्रतिसाद दिसून आला. सकाळी पहिल्या दोन तासात अवघे ९.६९ टक्के मतदान झाले असताना दुपारनंतर हळूहळू टक्केवारीत वाढ होत गेली. सर्व भागात पक्षाचे जवळजवळ बूथ लावण्यात आल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका शांततेत पार पडल्या.
पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ गटासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीपूर्वी मोखाडामधील पोशेरा आणि आसे या दोन तर एक कळंब गट जिल्हा परिषदेच्या जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांनी आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मदतीची परतफेड म्हणून मोखाडा तालुक्यातील दोन जागा एक भाजप व एक राष्ट्रवादी पक्षाला बिनविरोध मिळवून देण्यात यश मिळविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंगळवारी एकूण ५४ जागांसाठी निवडणुका पार पडल्या. तर ११४ पंचायत समितीच्या सरावली (सेना) व कळंब (भाजप) या दोन गणाच्या जागाही बिनविरोध झाल्याने मंगळवारी ११२ जागांसाठी निवडणुका पार पडल्या.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील बहुतांशी मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला.
तुरळक गर्दी असल्याने पहिल्या दोन तासात अवघे ९.६९ टक्के मतदान झाले. त्यानंतर हळूहळू मतदारांनी स्वत: आणि राजकीय पक्षाकडून खाजगी वाहने व रिक्षामधून मतदारांना मतदान केंद्राकडे आणले जात असल्याने ११.३० पर्यंत २०.४ टक्के मतदान झाले. पुढे १.३० वाजेपर्यंत ४०.५ टक्के आणि ३.३० वाजेपर्यंत ५२.९५ टक्के मतदान झाल्याने या वाढत्या मतदानाच्या अंदाजाने मतदारांनी मतदान केंद्राकडे आपला मोर्चा वळविल्याने संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सुमारे ६२.५० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तारापूर, दांडी आणि नंडोरे-देवखोप येथे शिवसेनेची ताकद पणाला लागली आहे. या भागात शिवसेनेच्या काही नाराजांना राष्ट्रवादीकडून गळाला लावण्यात आल्याची चर्चा आहे.
>मतदारांत सकाळी निरुत्साह, संध्याकाळी उत्साह
पालघर : पालघर तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या १७ व ८ पंचायत समितीच्या ३३ गणांच्या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदारामध्ये खूपच अनुत्साह दिसून आला. मात्र संध्याकाळी मतदारांनी घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात अवघे ९.७४ टक्के मतदान झाले होते.पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १७ गटांच्या जागेसाठी तर पंचायत समितीच्या ३४ जागेपैकी सरावली गण बिनविरोध झाल्याने ३३ गणांच्या जागेसाठी मंगळवारी निवडणुका पार पडल्या. सकाळी ७.३० ते ११.३० या दोन तासात ९.७४ टक्के, पुढच्या दोन तासात ११.३० वाजता २२.४६ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ३६.३० टक्के, पुढे ३.३० वाजता ४९.६ टक्के तर संध्याकाळी ५.३० वाजे पर्यंत ६३.५१ टक्के मतदान झाले. तालुक्यात होत असलेल्या या निवडणुकीत राज्यातील महाआघाडीचे गणित इथे कोलमडून पडल्याने शिवसेनेने स्वतंत्र लढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. याव्यतिरिक्त भाजपनेही एकला चलो रेचा नारा दिला असताना राष्ट्रवादी-काँग्रेस-बविआने काही ठिकाणी आघाडी केल्याचे पाहावयास मिळाले. तारापूर, दांडी, नंडोरे-देवखोप, बोईसर, सरावली आदी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेमधील नाराज गटाचा फटका उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यातच सेनेला भगदाड तर पडणार नाही ना? अशी शक्यता वर्तविली जात आहे.
>मतदारांमध्ये संभ्रत
वाडा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रसंगी एकाच मतदान यंत्रावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची निवडणूक चिन्हे असल्याने अशिक्षित मतदारांमध्ये संभ्रम दिसून आला. मतदान यंत्रांची शिटी काही
क्षण उशिरा वाजत असल्याने मतदार गोंधळून गेले होते. दरम्यान, आबिटघर गटातून जवळचे नातेवाईक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नरेश आकरे तर भाजपच्या धनश्री चौधरी यांची चिखले येथे मतदान केंद्रावर भेट झाल्याने त्यांना फोटोचा मोह आवरता आला नाही.
>वसई तालुक्याचा कारभारी कोण होणार?
पारोळ : वसई तालुक्यात तीन गट तर सात गणांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. बुधवारी मतमोजणी होणार असून बुधवारी दुपारपर्यंत तालुक्याचा कारभारी कोण हे स्पष्ट होणार आहे. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १० तर पंचायत समितीसाठी २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यात झालेला सावळागोंधळ मतदारांनी पाहिल्याने या निवडणुकीत मतदारांचा उत्साह कमी होता. पण ही स्थानिक निवडणूक असल्याने आणि गावांतील उमेदवार रिंगणात असल्याने सकाळी मतदान सुरू होताच थंडीच्या वातावरणातही काही मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळाल्या. सकाळी १० वाजेपर्यंत वसई तालुक्यात २० ते २५ टक्के मतदान झाले. दुपारी हा आकडा वाढत ५० टक्क्यांवर गेला. प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाताना दिसत होते. राजकीय पक्षात उमेदवारीवरून नाराजीचे वातावरण असल्याने आताच काही अंदाज बांधणे कठीण आहे.
>तलासरीत मतदारांची संध्याकाळी गर्दी
तलासरी : तलासरीत जिल्हा परिषद गटाच्या पाच आणि पंचायत समिती गणाच्या दहा जागांसाठी मंगळवारी शांततेत ६५.६४ टक्के मतदान झाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत १४.७१ टक्के मतदान, तर साडेअकरा वाजेपर्यंत ३२.४८ टक्के मतदान झाले तर दुपारी दीड वाजेपर्यंत मतदारांची संख्या तुरळक झाल्याने मतदान ४७.२४ टक्के होऊन संध्याकाळी मतदान वेळ संपायच्या वेळेअगोदर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली. तलासरीत पुरु ष ४०,९४२
मतदार, महिला ४०,१६१ मतदार असे एकूण ८१,१०३ मतदार आहेत. तलासरी तालुका हा गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेली प्रदेशाला लागून असल्याने या भागातून मतदारांना भुलविण्यासाठी मद्याचा आवक होणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी राज्याच्या सीमेवर कडक नाकाबंदी केली होती. त्यामुळे तलासरीत मतदान शांततेत पार पडले. मतदार रोजगारासाठी स्थलांतर झाल्याने अनेक ठिकाणची मतदानाची टक्केवारी घटली. उमेदवारांनी त्यांना मतदानासाठी परत आणण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरल्याने उमेदवारांची काळजी वाढली. तलासरी तालुक्यात कुठे दुरंगी तर तिरंगी, चौरंगी सामना झाला.