नियोजन चुकल्याने विद्यार्थ्यांना झोपेतून उठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:11 AM2018-03-17T03:11:43+5:302018-03-17T03:11:43+5:30
पंधरा मार्चपासून जिल्हा परिषद शाळांच्या सकाळ सत्राला प्रारंभ झाला. मात्र, या बाबत आदल्यादिवशी माहिती न दिल्याने थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात जाऊन झोपेतून उठवून आणायची वेळ गुरु वारी जिल्हा परिषद नरपड शाळेत घडली.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : पंधरा मार्चपासून जिल्हा परिषद शाळांच्या सकाळ सत्राला प्रारंभ झाला. मात्र, या बाबत आदल्यादिवशी माहिती न दिल्याने थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात जाऊन झोपेतून उठवून आणायची वेळ गुरु वारी जिल्हा परिषद नरपड शाळेत घडली.
या प्रकाराने पालकवर्गात कमालीचा संताप तर शाळेचा हा कारनामा हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शालेय वर्षात राबविण्या येणारे विविध उपक्र म, धार्मिक सण, थोर व्यक्तींची जयंती व पुण्यतिथी, गणपती या सुट्या, तसेच दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचे नियोजन शाळा सुरु होण्यापूर्वीच केले जाते. शिवाय १५ मार्चपासून ते ३१ मार्च पर्यंत सकाळच्या सत्रातील शाळा ७.३० ते १२.३० आणि १ एप्रिलपासून १२ मे पर्यंत ७.३० ते ११.३० या वेळेत शाळा भरविली जावी असे परिपत्रक पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने काढण्यात आल्याची प्रत लोकमतच्या हाती लागली आहे.
दरम्यान, शाळेच्या वेळेत दारू पिऊन धिंगाणा घालणारे शिक्षक, गणवेशाचा निधी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेणारे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख, खाजगी वाहनातून विद्यार्थ्यांंंना कोंबून अपघाताच्या दाढेत धकलणारे शिक्षक आणि लाच स्वीकारण्याच्या आरोपाखाली निलंबित गट शिक्षणाधिकारी या मुळे डहाणू पंचायत समितीचा शिक्षण विभाग या शैक्षणकि वर्षात कुप्रसिद्ध झाला आहे.
>बोरीकरांची पकड सैल ; खरपडे, गंधेंनी पुढाकार घ्यावा
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत आणि सीईओ डॉ. मिलिंद बोरीकर यांची प्रशासनावरची पकड सैल झाल्याची टीका होत आहे. तर दुसरीकडे सत्तारूढ प्रमाणेच विरोधी पक्षाचे या कडे दुर्लक्ष होत आहे. जि. प. अध्यक्ष विजय खरपडे आणि या विभागाचे प्रमुख या नात्याने शिक्षण सभापती निलेश गंधे यांनी जि. प. शाळांची अब्रू वाचिवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अन्यथा जि. प. शाळांची उतरती कळा थांबविणे अवघड होईल.