सांडपाण्यातील विषारी वायूमुळे तारापूर एमआयडीसीत पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:54 AM2019-01-21T00:54:04+5:302019-01-21T00:56:22+5:30
तारापूर एमआयडीसीमध्ये सांडपाण्यातील विषारी वायुमुळे शनिवारी रात्री श्वसन व डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवू लगल्याने के झोनमध्ये भीती पसरून सर्वत्र पळापळ झाली.
- पंकज राऊत
बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये सांडपाण्यातील विषारी वायुमुळे शनिवारी रात्री श्वसन व डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवू लगल्याने के झोनमध्ये भीती पसरून सर्वत्र पळापळ झाली. मात्र एवढी गंभीर घटना घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुपारी एक वाजता घटनास्थळी पोहचले तर पत्रकारांना घटनेची अगदी त्रोटक माहिती म.प्र.नि.मं.च्या अधिकाऱ्यांनी दिली
औद्योगिक क्षेत्रातील के झोन मध्ये असलेल्या प्लॉट नंबर के. दहा व अकरा मधील खन्ना अॅण्ड खन्ना लिमिटेड या रासायनिक कारखान्याच्या समोरून जाणाºया नाल्यामध्ये विषारी व दुर्गंधीयुक्त वायुमिश्रीत घातक रासायनिक सांडपाणी शनिवारी रात्री अनधिकृतपणे सोडल्याने त्या परिसरातील कारखान्यात काम करणाºया कामगारांना व रस्त्यावरून ये-जा करणाºया असंख्य नागरिकांना डोळ्यांची जळजळ व श्वसनास त्रास, मळमळ इत्यादी प्रकारचे त्रास जाणवू लागल्याने कामगार काम बंद करून सुरक्षित स्थळी पळाले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापुर एक चे उप प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर के झोन मधील कारखान्यात जाऊन पाहणी करु न सांड पाण्याचे नमुने घेत होते. त्या दरम्यान त्यांनी खन्ना अॅण्ड खन्ना लिमिटेड या कारखान्याच्या प्रवेशद्वारा जवळील जुन्या व बंद करण्यात आलेल्या सांडपाण्याच्या लाईनचे चेम्बर उघडायला लावून पाहणी केली असता त्या बंद परंतु अनिधकृतपणे वापरात असलेल्या लाइन मधील काळ्या व तेलकट रसायनाचा उग्र वास येवून डोळेही चुरचुरत होते. त्याचेही नमूने घेण्यात आले आहेत.
घटनास्थळी तारापूर अग्निशमन दलाची एक गाडी व जवान दुपारी साडे बारा पासून तत्परतेने हजर होते तर पोलीस परिसराची पाहणी करून गेले मात्र यासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये कुणीही तक्रार नोंदविली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं तर निश्चित घटना काय किती जणांना त्रास झाला.
यासंदर्भात प्राथमिक माहितीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही तर यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लाड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर माहिती दिली जाईल असे सांगितले. तर आॅक्टोबरमध्ये अशीच घटना घडून २१ चिमण्या मेल्या होत्या त्या घटनेची ही पुनरावृत्ती झाली असून तारापूर गॅस चेम्बर बनत असल्याची भीती रहिवाश्यांकडून व कारखानदारांकडून व्यक्त होत आहे .
>शनिवार व रविवार या दिवशी प्रशासनाला सुट्टी असते त्यावेळेस मोठया प्रमाणात कारखाने अवैधरित्या प्रदूषण करत असतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुटीच्या दिवशी व रात्रीच्या वेळी गस्त घालणे आवश्यक असताना ते ती घालत नाहीत.
- मनीष संखे, अध्यक्ष,
पर्यावरण दक्षता मंच तारापूर
>प्लॉट नंबर के १५ मधील आझाद इंडस्ट्रीज या कारखान्यातील कामगार मध्यरात्री काम सोडून पळाले तर रविवारी सकाळी ही पहिल्या पाळीतील कामगार घरी परत गेलेत
- जय किसन यादव,
मेन्टेनन्स इन्चार्ज
आझाद इंडस्ट्रीज तारापूर