वसई विरारमधील पाऊस व पुरामुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:23 AM2018-07-18T03:23:28+5:302018-07-18T03:23:33+5:30
वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले.
विरार : वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले. पाऊस गेल्यानंतर देखील अनेक परिसरातील सोसायटी मध्ये पाणी होते. तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांचे तर हाल झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिछाने, अन्न-धान्याची नासाडी झाली. जवळपास वसई विरार मधील ३०० बिल्डींगमध्ये पाणी जाऊन त्यातील रहिवाशांचे ५० हजार ते दोन लाखापर्यंतचे नुकसान झाले. त्यामुळे पालिकेने त्यांना भरपाई देण्याचे ठरवले आहे.
घरात ४ दिवस पाणी असल्याने फ्रीज खराब झाला, तर मुलीच्या लग्नासाठी घेतलेला सोफा देखील पाण्यात भिजून खराब झाला. घरातले किंमती सामान आता निकामी झाल्याने ते भंगारमध्ये विकण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर घरातील लग्न देखील आता पुढे ढकलावे लागणार आहे असे किशोर पंडित यांनी सांगितले. बॉक्समध्ये पाणी गेल्याने मीटर पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यामुळे नवीन मीटर लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, तोपर्यत अनेक नागरिकांना अंधारातच खितपत पडावे लागणार आहे असे जयेश जोशी यांनी सांगितले.
>नुकसान लाखोंचे, भरपाई मात्र काही हजारांची मिळणार
वसई तालुक्यात काही कोटींच्या वर नुकसान झाले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तहसीलदार नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करत आहे. नागरिकांना पाच हजार, दहा हजार भरपाई दिली जाणार आहे. मात्र लाखोंचे नुकसान झाले असतांना त्याची भरपाई पाच आणि दहा हजारात कशी होणार? हा विचार कोणी केला नाही. मध्यमवर्गीयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचप्रमाणे, पंचनाम्यासाठी लोकांनी घराबाहेर ठेवलेल्या सामानाला आता दुर्गंधी येणे सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे, यावर उपाय करावेत असे, गोसावी म्हणाले.