पावसामुळे रब्बीचे नुकसान , बागायतदार, वीटभट्टी व मंडप डेकोरेटरर्सनाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:23 AM2017-12-09T00:23:27+5:302017-12-09T00:23:32+5:30
ओखी वादळाचा तडाखा वसईला बसला असून डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत .
पारोळ : ओखी वादळाचा तडाखा वसईला बसला असून डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत .
या पावसामुळे रब्बी हंगामातील द्विदल पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे . रब्बीतील द्विदल पिके ही थंडीच्या मोसमातील पडणाºया दवबिंदूमुळे बहरतात. त्यामुळे या पिकांचे येथील शेतकरी कोणत्याही प्रकारे सिंचन करीत नाहीत . जमिनीतील ओलावा व रोज पडणारे दंव यांच्यावरच ही पिके जोमाने वाढतात . मात्र या पिकांच्या मुळाशी पाणी साठून राहिल्यास किंवा जास्त प्रमाणात ओलावा राहिल्यास मुळे कुजून जातात .या वर्षी ज्या प्रमाणे खरीप हंगाम परतीच्या पावसाने नुकसानीत घालवला तसाच सोमवार पासून या भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने रब्बी हंगामही वाया जातो की काय अशा चिंतेत शेतकरी आहेत . तसेच या पावसामुळे भाजी बागायतदारांची चिंता वाढवली असून मिरची,टोमॅटो ,दुधी,कारली , भेंडी, कांदे आदी पिकांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
शेती बरोबर येथील वीट उद्योगावर परिणाम झाला असून नुकत्याच करुन ठेवलेल्या कच्च्या विटांवर पाणी पडल्याने त्या विरघळल्या आहेत. लग्नसराई व मार्गर्शीष असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी डेकोरेटर्स मार्फत मंडप लावण्यात आले आहेत . अशा मंडपावर पाणी साचून ते उदध्वस्त झाल्याच्याही घटना घडल्या आहेत . तर अजूनही काही खळ्यात, खिरपात घेतलेल्या भात पिकांचे उडवे रचलेले आहेत ते पावसापासून वाचावेत म्हणून त्यांना ताडपत्रीद्वारे झाकण्यात आले आहेत . त्यांनाही ओलावा व दमट हवामानाचा त्रास होणार आहे.