मोखाड्यात भीषण पाणीटंचाई, ९ गावे १९ पाडे यांना १० टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:05 AM2018-04-09T03:05:39+5:302018-04-09T03:05:39+5:30
पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईने सवेधनशील असलेल्या मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे तालुक्यातील ४५ गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
रविंद्र साळवे
मोखाडा : पालघर जिल्ह्यात पाणी टंचाईने सवेधनशील असलेल्या मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे तालुक्यातील ४५ गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ९ गावे १९ पाडे यांना १० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे यामधील पेंडिंग ७ गावे १० पाड्यांच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून यामधील पोशेरा, नावळे पाडा, बेरिस्ते, चिकाडीचापाडा, धामणी पाडा, पिंपळगाव, मडक्याचीमेट, डोंगरवाडी उधळे या गाव पाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहेत.
मागणी केल्यानंतर चोवीस तासात टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देणे या सरकारी धोरणाला प्रशासनाकडून बगल दिली जात आहे. यामुळे येथे दहा ते पंधरा दिवस उलटूनही टॅँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वाट आदिवासींना पहावी लागत आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण करावी लागत आहे.
प्रत्येक वर्षी मोखाडा तालुक्यात जानेवारी सरताच पाणी टंचाईला सुरूवात होते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या शंभराच्या घरात पोहचते आहे. पाणी पुरवठा विभागाने ८८ गाव पाड्यांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. शासनाच्या धोरणानूसार टंचाई ग्रस्त गाव-पाडयांनी टँकर द्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केल्यास, तेथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी त्यांची तातडीने पाहणी करून, टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, तशी तातडीची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नाही.
शासनाच्या ३ फेब्रुवारी १९९९ च्या निर्णयानुसार दरडोई २० लीटर पाणी ग्रामीण भागाला निश्चित करण्यात आले आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने दरवर्षीच पाण्यासाठी वणवण करावी लागते.
>अधिग्रहणाचे अधिकार तहसिलदारांना द्या
मोखाड्यातून टंचाई ग्रस्त गाव-पाडयाकडून मागणी झाल्यास, तातडीने टॅँकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातात.ही प्रक्रीया विलंबाची असल्याने टँकर अधिग्रहण करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याची मागणी जिल्हा परिषद गट नेते प्रकाश निकम यांनी केली आहे.