उन्हाळी भातशेती पिके धोक्यात
By admin | Published: February 15, 2017 11:26 PM2017-02-15T23:26:48+5:302017-02-15T23:26:48+5:30
सूर्या कालव्याची वेळोवेळी साफ सफाई केली नसल्याने मोठया प्रमाणात गाळ,गोटे, झुडपे व गवत वाढल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो
कासा : सूर्या कालव्याची वेळोवेळी साफ सफाई केली नसल्याने मोठया प्रमाणात गाळ,गोटे, झुडपे व गवत वाढल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे संपूर्ण कालवाच गाळात रूतला अशी स्थिती असून उन्हाळी पिके धोक्यात सापडली आहेत.
या कालव्यातून डहाणू, पालघर तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळी शेतीला पाणीपुरवठा के ला जातो. याच पाण्यावर शेतकरी उन्हाळयात प्रामुख्याने भातशेती करतात. तसेच भुईमूग व भाजीपाल्याची लागवड करतात.
मात्र, गेल्या पाच वर्षापासून या कालव्यांची पूर्णपणे साफसफाई केली गेलेली नाही. तसेच, गाळही काढला गेलेला नाही.
त्यामुळे मुख्य कालव्याबरोबरच लघु कालवेही गाळाने भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. तसेच मुख्यकालव्यांतून लघूकालव्यांना पाणी सोडणारे गेट ही गाळाने भरल्याने पाणी बंद झाले आहे. तर काही ठिकाणी गेट तुटल्याने पाणी वाया जाते. यामुळे शेवटच्या गावातील शेतांना अपुरा पाणीपुरवठा होतो.
पेठ येथे वेळेवर पाणीपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांच्या भातरोपण्या आठवडाभर रखडल्या आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठयामुळे शेतकरी रोपणीच्या वेळेस कालव्यांना मध्येच बांध टाकत असल्याने पुढील गावांना पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे भातशेतीवर मोठा परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)