वादळसदृश्य परिस्थितीमुळे मच्छिमार नौका किनाऱ्यावर, मच्छिमारांमध्ये चिंतेचं वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 11:51 PM2022-08-07T23:51:12+5:302022-08-07T23:52:24+5:30
समुद्रात ५ ते ९ ऑगस्ट ह्या चार दिवसात ६५ किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई विभागाने मच्छीमाराना इशारा दिला होता.
- हितेंन नाईक
पालघर -समुद्रात ५ ते ९ ऑगस्ट ह्या चार दिवसात ६५किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई विभागाने मच्छीमाराना इशारा दिला होता.किनारपट्टीवर जोरदार पाऊस आणि वारे अश्या वादलसदृश्य वातावरणात आजही पालघर,वसई,डहाणू तालुक्यातील सुमारे एक ते दीड हजार बोटी समुद्रात असल्याने मच्छीमारांच्या घरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
१ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसाचा मासेमारी बंदी कालावधी संपला असला तरी समुद्रात निर्माण होणारी वादळे आणि तुफानी लाटांचे डोंगर अशी धोकादायक परिस्थिती अजूनही संपलेली नाही. त्यामुळे आजही मच्छीमारांच्या डोक्यावर समुद्रातील वादळी वारे आणि तुफानी लाटा रुपी धोक्याची घंटा घोंगावतच आहे.
क्यार,महा आदी वादळामुळे आधीच संकटात सापडलेला जिल्ह्यातील मच्छिमारांच्या दोन हजार बोटी १ऑगस्ट पासून समुद्रात गेल्या आहेत.समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याने सावधानतेचा इशारा मच्छिमार संस्थांना देण्यात आल्याची माहिती पालघरचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त दिनेश पाटील ह्यांनी लोकमत ला दिली.ह्या इशाऱ्या नंतर ही जिल्ह्यातील सुमारे दीड हजार बोटी आजही समुद्रात उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे.
किनारपट्टीवरून सुमारे आठ ते दहा तास दूरवरून किनाऱ्यावर येणे आणि पुन्हा मासेमारीला जाणे डिझेल च्या वाढत्या भाववाढीमुळे आणि कामगारांच्या पगारामुळे परवडत नसल्याने धोकादायक परिस्थितीत ही ह्या सर्व बोटी समुद्रात ठाण मांडून उभ्या असल्याचे एका मच्छीमाराने लोकमत ला सांगितले.माश्याचे प्रमाण अत्यल्प असताना आम्हाला पुरेसे मासे मिळालेले नाही त्यामुळे कर्ज काढून पहिलीच फेरी मासेमारीला गेलेल्या बोटीला मासेच मिळाले नाहीत तर मग पुढच्या फेरीसाठी डिझेल,बर्फ,कामगारांच्या पगारासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न मच्छिमार रजनीकांत पाटील ह्यांनी उपस्थित केला आहे.
आजही जिल्ह्याच्या झाई - बोर्डी ते वसई दरम्यानच्या ११०किमी किनारपट्टीवरील सुमारे एक ते दीड हजार बोटी समुद्रात असून ह्या वादळाचा तडाखा बसल्यास मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.