रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने दीड महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 06:28 AM2023-07-12T06:28:39+5:302023-07-12T06:29:04+5:30
आदिवासी पाड्यांवर सुविधांचा दुष्काळ
वाडा/विक्रमगड (जि. पालघर) : गारगाई व पिंजाळ नदी बेटावर असलेल्या म्हसेपाडा येथील दीड महिन्याच्या चिमुकलीला रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. लावण्या नरेश चव्हाण (वय ४२ दिवस) असे या बालिकेचे नाव आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचा आरोप होत आहे. वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर तसेच गारगाई व पिंजाळ नदीच्या बेटावर म्हसेपाडा हे गाव आहे. गावाची लोकसंख्या अवघी २०० च्या आसपास आहे. वाडा येथे ग्रामीण रुग्णालय व विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते या आदिवासी पाड्यापासून दूर आहे. लावण्याला सोमवारी रात्री ताप आला होता. कुटुंबियांनी घरगुती उपचार केले, मात्र त्यानंतर तिला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे पहाटे तिला पायवाटेने मलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. न्यूमोनियाने हे बाळ दगावल्याची माहिती विक्रमगडचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप निंबाळकर यांनी दिली.
रुग्णाला न्यावे लागते डोलीत
पाड्यावर रस्ता नसल्याने बाजार, शाळा-महाविद्यालय व रुग्णालयात जाण्यासाठी नागरिकांना पायी प्रवासा करावा लागतो. अजूनही पाड्यावर रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णाला डोलीत न्यावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाने अनेकांना जीव गमवावा लागतो.
पाड्यावरील नदीपात्रात पुलाची मागणी मागील वर्षी करण्यात आली होती, परंतु पूल मंजूर झालेला नाही.- एस. एम. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता