अवकाळी पावसामुळे शेतकरी, मच्छीमारांचे झाले मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:39 AM2023-05-03T10:39:09+5:302023-05-03T10:39:20+5:30
पाच तास धुमाकूळ घातल्याने साचली पाण्याची डबकी
पालघर - जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते १ मे रोजी ध्वजारोहण सुरू असतानाच पावसाने पाच तास धुमाकूळ घातल्याने कार्यक्रम स्थळाजवळ पाण्याची डबकी निर्माण झाली, तर जिल्ह्यात पावसामुळे वीटभट्टी, सुके मासे यासह आंबा, जांभूळ, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांत १ लाख ४७ हजार ४२५ हेक्टर लागवडीचे क्षेत्रफळ असून, त्यातील १ लाख ४ हजार क्षेत्रावर भात, नागली, वेलवर्गीय भाजीपाला, फळे आदींची लागवड केली जाते. रविवारी जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथे तासभर पाऊस कोसळला होता. तर १ मे रोजी पालघरच्या पोलिस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांना सुमारे दीड तास अडकून पडावे लागले होते. दुसरीकडे मिरची, पडवळ, कारली, भोपळी मिरची या भाजीपाल्याचे तर आंबा, काजू, जांभूळ आदी पिकांचे मोठे नुकसान होत झाडाखाली आंबा, जांभूळ या फळांचा मोठा सडा पडला होता. पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील फुल शेतीसह किनारपट्टीवर वाळत घातलेल्या बोंबील, मांदेली, करंदी आदींना मोठा फटाका बसला. त्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
चिखलामुळे वाहनचालकांना करावी लागली कसरत
कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या चारचाकी गाड्या चिखलात रुतून बसल्याने ही वाहने बाहेर काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर मार्च महिन्यात पडलेल्या पावसाने फळे, फुले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उरलेल्या पिकाचे पुन्हा नुकसान झाल्याचे दिसून आले.