मुरबाडमध्ये पाणीटंचाईमुळे लग्न जुळणे कठीण; पाण्यासाठी महिलांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:09 PM2021-04-25T23:09:10+5:302021-04-25T23:09:16+5:30
पाण्यासाठी महिलांची वणवण : रोजगारही बुडत असल्याची केली तक्रार, टँकरने पुरवठा सुरू
प्रकाश जाधव
मुरबाड : खेडेगावात दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या गरिबाची सून होईन, पण घोटभर पाण्यासाठी भटकंती करायला लावणारा श्रीमंत नवरा नको अशी व्यथा पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील पाणीटंचाई असणाऱ्या गावातील तरुण, तरुणींनी जरी उच्च शिक्षण घेतले असले तरी लग्न जुळण्यास अडचणी येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यातील सासणे, पाटगाव, वाघाची वाडी, बाटलीतील वाडी, तोंडली, साकुर्ली, साजई, तुळई, फांगणे, फांगुळ ग्रहात, आंबेमाळ, चिंचवाडी, वाल्हिवरे, थितबी या गावांतील पाणवठ्यांनी तळ गाठला असून गावात इतर सर्व सुविधा असलेल्या तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने १६ तास हे पाण्याच्या शोधात घालवावे लागतात. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार शोधावा की कोरड्या घशाला ओलावा देण्यासाठी पाणी शोधावे या विंवचनेत महिला सापडल्या आहेत.
दिसेल त्या पाणवठ्यावर महिलांचा घोळका दिसतो. सरकारने ग्रामीण आणि डोंगराळ भागात ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे त्या ठिकाणी कोट्यवधींच्या योजना राबविल्या, मात्र त्या योजना स्थानिक पुढाऱ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचू न दिल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
डिसेंबर ते मे दरम्यान या भागात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर २४ गावे व ३८ पाडे अशा ६२ गावांचा टंचाई आराखडा तयार करून ५४ गावात आणि पाड्यात विंधन विहिरीचे काम प्रगतीपथावर आहे.
टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी मुरबाड तालुक्यात पाच टँकर पाणीपुरवठा विभागाने तैनात केले असले तरी ते टँकर टंचाईग्रस्त भागात पोहोचत नसल्यामुळे महिलांची भटकंती सुरूच आहे. सर्वत्र कोरोनाचे सावट असताना व भरउन्हात महिला वर्ग आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन पाण्यासाठी भटकंती करत आहेत.