पाणीटंचाईने चिंचणीत हाहाकार; योजनेच्या नूतनीकरणास चार वर्षांपूर्वी प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:22 AM2018-06-08T02:22:20+5:302018-06-08T02:22:20+5:30
तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
डहाणू : तालुक्यातील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन, चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. डहाणूच्या साखरे, कवडास, धरणांत मुबलक पाणी साठा असतांनाही डहाणू पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने येथील ग्रामस्थांना तीन, चार, आठ दिवसांनी अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याने येथील महिलांवर ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
डहाणूच्या सागरी किनारपट्टीवरील २६ गावांना तसेच पालघर बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथे साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो, परंतु जीर्ण व जुनाट झालेल्या बाडापोखरण योजनेचा सर्वत्र बोजवारा उडाल्याने पुरवठा व्यवस्थीत होत नसल्याने येथील महिलांना दुसऱ्या प्रभागात जाऊन पाणी भरावे लागते आहे. वीस हजार लोकसंख्या असलेल्या चिंचणी गावात सुमारे पाच हजार नळ कनेक्शनधारक असून येथील शेवटच्या टोकावर असलेले मोरीपाडा, रिफाई नगरी, भाटीपाडा, बारवाडा, इत्यादी प्रभागात पाणी येत नसल्याने येथील महिला कमालीच्या त्रस्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे चिंचणी गावात काही मोठमोठया लोकांनी बेकायदेशीरित्या तीन, चार नळ कनेक्शन घेऊन केवळ एकच कनेक्शनचे पैसे ग्रामपंचातीला भरणा करीत असल्याने शिवाय ते पाण्याचा दुरूपयोग करीत असल्याने इतर नळकनेक्शन धारकांना त्याचा फटका बसून त्यांच्यावर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
पाणीयोजना नूतनीकरणासाठी ४३ कोटी मंजूर करून ५ मार्च २०१४ ला या कामाची सुरूवात करण्यात आली. परंतु अनेक वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदार कंपनी कडून बाडापोखरण योजनेचे काम अपूर्णच राहिले.