डोळखांब भागातील गांडूळवाड गावात भीषण पाणीटंचाई, पाण्याअभावी जनावरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:39 AM2019-05-11T00:39:10+5:302019-05-11T00:39:34+5:30

धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांसहीत धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही मोठ्या प्रमाणात टंचाईचा सामना करावा लागतो आहे.

Due to water shortage, animal death due to lack of water in village Vadwad in Dolchham area | डोळखांब भागातील गांडूळवाड गावात भीषण पाणीटंचाई, पाण्याअभावी जनावरांचा मृत्यू

डोळखांब भागातील गांडूळवाड गावात भीषण पाणीटंचाई, पाण्याअभावी जनावरांचा मृत्यू

googlenewsNext

- वसंत पानसरे
किन्हवली - धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांसहीत धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही मोठ्या प्रमाणात टंचाईचा सामना करावा लागतो आहे. डोळखांब - कसारा या मुख्य रस्त्यावरून २ किमी. दुर्गम भागात असलेल्या तळवडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गांडूळवाड या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १३५ घरांची वस्ती, १२०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावाला पाणी समस्या भेडसावते आहे. २९ तारखेला झालेल्या गाव यात्रेलाही या टंचाईचा फटका बसला आहे.

२००४ मध्ये जलस्वराज्य योजनेमधून १ कोटींच्या आसपास रक्कम असलेल्या नळयोजनेसाठी एक टाकी बांधण्यात आली. मुख्य रस्त्यापासून २ किमी. अंतरावर असलेल्या गावापर्यंत २२ लाखांचा खर्च करून या योजनेचे काम करण्यात आले. गांडुळवाड फाट्याजवळ असलेल्या परंतु योग्य नियोजन नसल्याने या टाकीत पाणीच चढले नाही. त्यामुळे ही नळयोजना बारगळली. डोळखांब धरणाच्या विहिरीतून गांडूळवाड येथील विहिरीत पाणी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीही ही योजना अयशस्वीच ठरली. १२ दिवसांपूर्वी ही योजना पुन्हा सुरू करून पाणी देण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही येथील विहिरीत पाणी पोहोचतच नसल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. येथील महिलांना कपडे धुण्यासाठी पुरुषांच्या मदतीने डोळखांब धरण किंवा चोर नदी येथे जावे लागते आहे. दरवर्षीच्या या समस्येने येथील महिला वर्ग कमालीचा संतप्त झाला आहे.

या ठिकाणी असलेल्या विहिरी आटल्याने, पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने येथील ग्रामस्थांना टँकरने आलेले पाणी पुरत नाही. परिणामी, ३ किमी. अंतरावरील एका खाजगी फार्महाऊसमधून आपली पाण्याची गरज भागवावी लागते आहे. पाणी योजनेचा उडालेला बोजवारा, टँकरचे अपुरे पाणी, आणि गावातील विहीरीमध्ये पाणी नसल्याने फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली.

पाण्याअभावी गांडुळवाड येथील आदिवासींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. येथील जनावरेही पाण्याअभावी मृत पावत आहेत. येथे असणाºया विहिरीच्या बाजूलाच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, योजनेसाठी एक बंधारा बांधला होता. त्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.

पाणी नसल्याने शौचालय बंद
पाण्याच्या भीषण टंचाईने येथे असलेले शौचालय बंद दिसून येते. पिण्यासाठीच पाणी नाही तर शौचालयाचा वापर कोण करणार असा सवाल येथील ग्रामस्थ करतात.

आमच्या गावात टँकर येतो परंतु लोकसंख्या जास्त असल्याने दिवसाआड येणारा १ टँकर पुरत नाही. आम्हाला रात्री अंधारात पाणी भरावे लागते. तसेच कपडे धुण्यासाठी आम्हाला डोळखांब धरणावर चालत जावे लागते.
- येमी गोमा हंबीर, महिला ग्रामस्थ, गांडूळवाड.


या गावातील नळपाणी पुरवठा योजनेचे १ लाख ३ हजार रुपयांचे बिल थकित असून महाराष्ट्र वीज वितरण कंपणीने मीटर काढून नेला आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाई जाणवू लागली. आमच्याविभागाकडून काही दिवस पाण्याचा टँकर पाठवत होतो. नुकताच विद्युत प्रवाह पूर्ववत केल्याने पाण्याची टंचाई लवकरच दूर होईल.
- एम.आव्हाड, उपअभियंता पाणी पुरवठा, पं.स.शहापूर

Web Title: Due to water shortage, animal death due to lack of water in village Vadwad in Dolchham area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.