चोरी, घरफोडी करणाऱ्या दुकलीला अटक; १० गुन्ह्यांची उकल, वालीव पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 05:23 PM2023-04-14T17:23:49+5:302023-04-14T17:24:45+5:30
चोरी, घरफोडी करणाऱ्या दुकलीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी पकडले आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा : चोरी, घरफोडी करणाऱ्या दुकलीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी पकडले आहे. या दोन्ही आरोपींकडून १० गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शुक्रवारी दिली आहे.
वालीव पोलीस ठाणे हद्दीतील सतत दिवसा व रात्री चोरी व घरफोडी चोरींच्या गुन्हयांमध्ये वाढत झाली होती. सदरबाबत वरिष्ठांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत व गुन्हयास पायबंद घालणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण व दिवसा व रात्री गुन्हे घडलेल्या घटनास्थळावरुन प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी भावेश महेश वेदक (२२) आणि बद्रीआलम अकलाख चौधरी ऊर्फ पप्पु (३०) या दोघांना ७ एप्रिलला ताब्यात घेऊन कौशल्याने तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे हद्दीत १० गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपीकडुन सोन्याचे दागिने व इतर वस्तू असा एकूण ३ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे, बाळु कुटे, गजानन गरीबे, अभिजीत गढरी यांनी केली आहे.